व्यापार्‍यांसमोर आर्थिक आणीबाणीचा सामना!

ग्राहकांवरच व्यापार अवलंबून; आता शिथिलता अपेक्षित
व्यापार्‍यांसमोर आर्थिक आणीबाणीचा सामना!

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायांवर बंदी आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल तीन महिने आणि आता दुसर्‍या टप्प्यातही गेल्या दीड महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने व्यापार्‍यांना आर्थिक आणीबाणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचे थांबलेले अर्थचक्र पूर्ववत करण्यासाठी शासनाने जून महिन्यापासून शिथिलता देऊन व्यापारी वर्गाला न्याय द्यावा अशी अपेक्षा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडिया यांनी व्यक्त केली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी व्हायलाच पाहिजे यात दुमत नाही. व्यवसाय बंद असल्याने व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कित्येक व्यापार्‍यांना अर्थिक फटका बसला आहे. कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे कामगारांचे वेतन,बँकांचे हप्ते,कुंटुबियांचे उदरनिर्वाह,वैद्यकीय खर्च यामुळे व्यापारी प्रचंड निराश झाले आहेत. काही व्यापार्‍यांवर तर त्यांची मालमत्ता विक्री करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

आता जिल्ह्यासह राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख वेगाने खाली येऊन बाधितांची संख्या कमी होत असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे.त्यामुळे थांबलेले अर्थचक्र पून्हा सुरळीत करणे आवश्यक असल्याचे मत बरडिया यांनी व्यक्त केले.व्यापारी त्याची वेदना,व्यथा कोणाला सांगू शकत नाही.ग्राहकच हा व्यापार्‍यांसाठी देव आहे.ग्राहकांवरच व्यापार अवलंबून आहे.त्यामुळे सरकारने आता अंत पाहू नये.

आतापर्यंत सरकारला व्यापार्‍यांनी सहकार्य केले आहे. यापूढेही सहकार्य करतीलच.मात्र आता सरकारनेही व्यापार्‍यांना सहकार्य करुन जून महिन्यापासून व्यापार पूर्ववत करण्यासाठी शिथिलता द्यावी.जेणे करुन थांबलेले अर्थचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होईल आणि झालेली तूट भरुन निघण्यासाठी पावले उचलावी अशी अपेक्षा ललित बरडिया यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनमुळे व्यापार्‍यांना अनेक आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी राज्यातील पाच संघटना एकत्र येऊन ट्रेडर्स युनायटेड फोरम ऑफ महाराष्ट्र आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून व्यवसाय पूर्ववत करण्याची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.सरकार न्याय देईल अशी अपेक्षा आहे.

ललित बरडिया, सचिव, जिल्हा व्यापारी महामंडळ

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com