आरटीओकडून रिक्षाचालकांना लवकरच अर्थसहाय्य

जिल्ह्यात आठ हजाराहून अधिक परवानाधारक रिक्षाचालक; ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक
आरटीओकडून रिक्षाचालकांना लवकरच अर्थसहाय्य

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

शासनाच्या आदेशानुसार आर्थिक सहाय्य योजनेतंर्गत परवानाधारक रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यात एकूण आठ हजाराहून परवानाधारक रिक्षाचालक असून ते या मदतीसाठी पात्र ठरणार आहेत.

मात्र प्रत्येक रिक्षाचालकाला कार्यालयाने दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. या अर्जाची पडताळणी झाल्यावर पात्र असलेल्या रिक्षाचालकाच्या थेट खात्यात आर्थिक सहाय्य योजनेचे 1 हजार 500 रुपये जमा होणार आहेत. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांनी बोलतांना दिली आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षापासून राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना नियंत्रणात यावा यासाठी शासनाकडून लॉकडाऊनसह कडक निर्बंध घोषित करण्यात आलेले आहेत. या निर्बंधामुळे रिक्षा बंद आहेत. रिक्षा बंद असल्याने या व्यवसायावर उदरनिर्वाह असलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

रिक्षाचालक संघटनांनी निवेदनाव्दारे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून रिक्षाचालकांना 1 हजार 500 रुपयांची मदत करण्याचे आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार जळगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची यंत्रणा तब्बल महिनाभरापासून कामाला लागली होती. यात परवानाधारक रिक्षाचालकांची माहिती काढण्यासह इतर माहिती गोळा करण्याचे काम करण्यात आले. दरम्यान मदतीसाठीचे आवश्यक ते संकेतस्थळही तयार असून येत्या दोन दिवसात ते सुरु होणार आहे.

अर्ज पात्र ठरल्यावर पाच दिवसात होणार रक्कम जमा

आर्थिक मदतीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीन ते चार कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. मदत मिळण्यासाठी कार्यालयाने दिलेल्या संकेतस्थळावर रिक्षाचालकाने ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज भरल्यानंतर त्याची कार्यालयाकडून तपासणी करण्यात येईल. पात्र ठरल्यानंतर तीन ते चार दिवसात थेट संबधित रिक्षाचालकाच्या खात्यावर 1 हजार 500 रुपये जमा होतील. ही मदत एकदाच मिळणार आहे. अशी माहिती चंद्रशेखर इंगळे यांनी दिली. दोन दिवसानंतर संकेतस्थळ सुरु होणार आहे. जिल्ह्यात एकूण आठ हजाराहून अधिक परवानाधारक रिक्षाचालक असून त्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com