अव्वल कारकूनाची स्वाक्षरी करत पैसे मिळविण्याचा ठेकेदाराचा प्रताप

जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार ; फसवणूक करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल
अव्वल कारकूनाची स्वाक्षरी करत पैसे मिळविण्याचा ठेकेदाराचा प्रताप
Crime

जळगाव - Jalgaon

धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील घेतलेला वाळूचा ठेका ग्रामस्थांच्य त्रासामुळे रद्द झाला आहे. हा ठेका रद्द झाल्याने या ठेक्यासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळवण्यासाठी बालाजी कुपन ऑनलाईन लॉटरीचा प्रोपायटर नईम शेख अकबर, रा. एमआयडीसी याने चक्क अव्वल कारकूनची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्का वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान घडलेला हा प्रकार लक्षात आल्यावर याप्रकरणी काल मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नईक अकबर याच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र सुदाम पाटील रा. द्रोपद्री नगर हे अव्वल कारकून म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेत नोकरीला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असे की, धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील वाळूचा ठेका एमआयडीसी येथील रहिवासी नईम अकबर शेख यांनी घेतला होता. आव्हाणी येथील ग्रामस्थांच्या होत असलेल्या त्रासामुळे हा ठेका रद्द करुन हा ठेका घेण्यासाठी भरलेली संपूर्ण रक्कम परत मिळावी यासाठी नईम शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ५ एप्रिल २०२१ ते १७ मार्च २०२१ दरम्यान अर्ज केला. तसेच या अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखा येथील अव्वल कारकुन राजेंद्र पाटील यांचा बनावट स्वाक्षरी तसेच कार्यालयाचा बनावट शिक्का वापरुन हे प्रकरण गौणखजिन विभागात नईक शेख याने सादर केला. दरम्यान १५ मार्च ते ५ एप्रिल या काळात अव्वल कारकून राजेंद्र पाटील हे सुट्टीवर होेते.

अव्वल कारकून सुट्टीवर असल्याने केली बनावट स्वाक्षरी

ग्रौणखनिज विभागाने नईम शेख याने सादर केलेल्या अर्जाची तपासणी केली. अर्जावर पोहच म्हणून अव्वल कारकून राजेंद्र पाटील यांची स्वाक्षरी तसेच त्यांच्या टपाल शाखेचा शिक्का असल्याने गौणखजिन विभागाचे गवई यांनी १६ एप्रिल रोजी संबंधित प्रकाराबाबत राजेंद्र पाटील यांना विचारणा केली. अर्ज या तारखेत सादर झाला त्या दरम्यान १५ मार्च ते ५ एप्रिलच्या काळात रजेवर असल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. त्याबाबतचा खुलासाही राजेंद्र पाटील यांनी सामान्य शाखेचे तहसीलदार यांना दिला. दरम्यान शेख याने दिलेल्या संबंधित अर्जावर राजेंद्र पाटील यांची केलेले स्वाक्षरी ही बनावट असल्याचे तसेच शिक्काही बनावट असल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी याबाबत सामान्य शाखेचे तहसीलदार यांना गुन्हा दाखल करण्याच्या कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राजेंद्र पाटील यांनी काल मंगळवारी २५ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कागदपत्रासह तक्रार दिली. या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नईम शेख अकबर याच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com