<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव तालुक्यात बोगस खतांचे रॅकेट आमदार मंगेश चव्हाण यांनी उघडकीस आणल्यानंतर आता मात्र काही बियाणे कंपन्या या चाळीसगाव तालुक्यातील शेतकर्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकर्यांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस येत आहे. </p>.<p>आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तालुक्यातील शेतकर्यांना हायटेक कंपनी मार्फत बोगस ज्वारी बियाण्याच्या पिकाला ५ ते १० टक्के प्रमाणातच दाणे लागल्याच्या वाढत्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बोरखेडा बु, उंबरखेड, खरजई व इतर गावातील शेतकर्यांनी हायटेक कपंनीचे ज्वारी वाण ३२०१, ३२०६ याचे या रब्बी हंगामात स्थानिक कृषी केंद्रांमार्फत बियाणे खरेदी केले होते. मात्र या बियाण्यांची उगवण पुर्ण व्यवस्थीत झाली पण कणसांना धान्याचा भरणाच न झाल्याने तालुक्यातील शेतकर्यांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले. आमदार चव्हाण यांनी तालुका कृषी अधिकारी साठे साहेब व पंचायत समिती कृषी अधिकारी भालेराव साहेब व तालुक्यातील कृषी केंद्र चालक यांच्यासोबत खरजई शिवारातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या ज्वारी पिकाची पाहणी करुन, संबंधीत कंपनीलर गुन्हे दाखल करुन, शेतकर्यांना भरपाई देण्याचा सूचना आधिकार्यांना केल्या आहेत.</p>