रक्तच जेथे सूड साधते, तेथे कसली माया…! ; बापाने केली मुलीची हत्या
जळगाव

रक्तच जेथे सूड साधते, तेथे कसली माया…! ; बापाने केली मुलीची हत्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

पती-पत्नीच्या भांडणातून बापाने केली मुलीची हत्या

जळगाव/पारोळा – प्रतिनिधी 

जन्मदात्या पित्याने सात वर्षाच्या लेकीचा गळा दाबून बापलेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे. असं म्हणतात मुलिचं आणि वडीलाचं नातं खूप भावनिक असतं लेक उत्साहाचा झरा असते तर बाप हा वात्सल्याचा पाझर असतो. त्या दोघांच नातं जणू प्रेमाचं आगार असतं अशा या प्रेमळ नात्याचा गळा घोटणारा तो निर्दयी बाप अचानक राक्षस कसा झाला असेल? या एकाच प्रश्नानं समाजमन सुन्न व्हावं अशी ही घटना.

रक्तच जिथं सूड साधायला निघाले असेल तर तेथे कसली माया! असा हा प्रसंग. लेकीच्या सुखासाठी झटणारा बाप असतो, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाराही बापच असतो.

अबोल राहून लेकीवर प्रेम फुलविणारा बाप असतो. कितीतरी कवी, लेखकांनी या नात्यावरच्या रचनांनी बाप नावाच्या माणसाचं कौतुक केलं असतांना त्या कोमल परीच्या नशिबी असा क्रूर निर्दयी बाप यावा आणि त्याने त्या निष्पाप जीवाचा गळा घोटावा यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते?

बाप आणि लेकीचं नात जसं शब्दात मांडणे कठीण असते तसेच या भीषण आणि भयावह घटनेची चर्चा करणेही अंगावर शहारे आणते. मानवी मनाचा थरकाप उडावा असा हा एकूण प्रसंग!

शहाळ्यासारखा कठोर पण आतून नितळ मधूर पाण्याचा झरा असलेला बाप मुलीच्या बालपणीच्या आठवणीत रंगून जातो. लेकीने कडकडून मारलेल्या मिठीने आणि तिच्या घुंगूरवाळ्याच्या आवाजांनी तो सुखावून जातो. पण संदीप चौधरी नावाच्या पित्याच्या अंगात असा अचानक दैत्य संचारला तरी कसा आणि कशासाठी? लोखंडाला जोडणारा  हा जोडारी (वेल्डर) कोमल निरागस लेकीचा खून करण्यास का प्रवृत्त झाला असेल? कौटूंबिक असो की, किरकोळ भांडण त्यातून पोटच्या लेकीला मारुन त्याला काय मिळाले असेल? त्या बापातला जिव्हाळा असा अचानक कसा आटला असेल असा प्रश्न माता-भगिनींना पडला असेलच.

महाकवी गदीमांनी जिव्हाळा चित्रपटासाठी लिहीलेल्या गीतामध्ये ‘लळा जिव्हाळा, शब्दच खोटे माश्या मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही.’ अशी ही परिस्थिती अचानक का ओढवली असेल. हा यक्ष प्रश्न कायम राहतो. गदीमा, म्हणतात रक्तच जेथे सूड साधते. तेथे कसली माया, कोण कुणाची बहिण-भाऊ, पती, पुत्र वा जाया. सांगायाची सगळी नाती. जो-तो आपुले पाही. असा हा प्रकार आहे. घरात आणि कुटूंबात संवाद नसणे, शुल्लक कारणातून उद्भवणारे वाद त्यातून निर्माण झालेले मतभेद, अबोला अशा या शुल्लक करणातून ‘त्या’ निष्पाप निरागस परीच्या पित्याने असा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या काळजाला पाझरं का फुटला नाही.

आपल्या घरात मुलगी जन्माला येणं म्हणजे भाग्याची गोष्ट असते. ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ साठी सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री’ अशी योजना आणली. इथे मात्र हा निर्दयी बापच तिच्या क्लासमध्ये जातो आणि शिक्षण अर्धवट सोडून तिला नदीकाठी नेवून गळा दाबून जीवे ठार करतो. हे करतांना त्याला काहीच कसे वाटले नसेल. हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमानातील आनंदी क्षण, आणि भविष्यातील आशा आणि आश्वासन असणारी कोमल परी बापानेच तिचा गळा दाबून कायमस्वरुपी नाहिशी केली. का आणि कशासाठी हे न उलगडणारे कोडं प्रत्येकाला भेडसावत राहीलं.

एक तरी मुलगी असावी, कळी उमलतांना पाहता यावी, मनातील गुपीतं तिने हळूच कानात सांगावी. या बाप नावाच्या माणसाच्या भोळ्याभाबड्या अपेक्षेवर संदीप चौधरी या निर्दयी बापाने काळे फासले आहे. इतकेच या घटनेचे सत्य असेल काय? हा प्रश्न पोलीस सोडवतील.

Deshdoot
www.deshdoot.com