अपघात | Accident
अपघात | Accident
जळगाव

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ अज्ञात वाहनाने मुरुम घ्यायला जाणार्‍या बैलगाडीस गुरुवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात गाडीला जुपलेली बैलजोडी जागीच ठार झाली. तर बैलगाडीवरील जखमी शेतकर्‍यास दवाखान्यात दाखल करण्यासाठी हलविण्यात आले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

पाळधी येथील जयसिंग व्यंकट पाटील (वय ५५) यांच्या घरासमोरील अंगणात पावसामुळे पाण्याचे डबके साचले होते. त्या डबक्यात भर टाकण्यासाठी ते मुरुम घेण्यासाठी पिंपळकोठा परिसरात बैलजोडीने निघाले होते. त्यांची बैलजोडी महामार्ग ओलांडत होती. या वेळी एरंडोलकडून जळगावकडे येणार्‍या एका अज्ञात वाहनाने बैलगाडीस जोरदार धडक दिली. यात बैलजोडी जागीच ठार झाली. तर शेतकरी जयसिंग पाटील गंभीर जखमी झाले.

अज्ञात वाहनावरील चालक वाहनासह पसार झाला आहे.या घटनेबाबत कळताच ग्रामस्थांनी जखमी पाटील यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी जळगावकडे हलविले. मात्र, शेतकर्‍याचा वाटेतच मृत्यू झाला.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता शेतकर्‍याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत जाधव यांनी खबर दिली. त्यावरुन नशिराबाद पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद झाली. परंतु, या अपघाताबाबत पाळधी दूरक्षेत्रात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Deshdoot
www.deshdoot.com