कर्जबाजारीमुळे विषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

शेतात सततच्या नुकसानामुळे कर्जाचा डोंगर
कर्जबाजारीमुळे विषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

जळगाव - Jalgaon

तालुक्यातील नांद्रा बुद्रूक येथील बाळू बुधा पाटील वय ५२ या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातच विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना सोमवार, २७ सप्टेंबर रोजी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास बाळू पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

मयत बाळू पाटील यांचा भाचा चंद्रकात पाटील रा. ममुराबाद यांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, नांद्रा शिवारात बाळू पाटील यांचे तीन बीघे शेत आहे. यंदा त्यांना शेती बागायती केली आहे. त्यासाठी सोसायटीचे तर इतरांकडून हातऊसनवारीने अडीच ते तीन लाख रुपये कर्ज घेतले होते. सततच्या पावसामुळे नुकसान झाले. उत्पन्न नसल्याने ताणतणावातून २२ सप्टेंबर रोजी बाळू पाटील यांनी त्यांच्याच शेतात फवारणी औषध प्राशन केले.

शेतात काम करणार्‍या महिलांच्या प्रकरा लक्षात आल्यानंतर कुटुंबियानी बाळू पाटील यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पाच दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरु होते. मात्र बाळू पाटील यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योती मालवली. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत बाळू पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सरला, मुलगी रचनाा व मुलगा तुषार असा परिवार आहे. दोन्ही मुलेही शिक्षण घेत आहेत.

Related Stories

No stories found.