शेतकर्‍याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या

आसोदा रेल्वेगेटजवळील घटना
शेतकर्‍याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

धावत्या रेल्वेखाली झोकून देत यशवंत हेमराज चौधरी (वय- 55) रा.दशरथनगर, जुना खेडी रोड या शेतक-याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेटजवळ घडली. शेतकर्‍याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दशरथ नगरात यशवंत चौधरी हे पत्नी मिनाक्षी यांच्यासह वास्तव्यास आहे. जळगाव तालुक्यातील आवार शिवारात त्यांची शेती असून शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात.

शुक्रवारी दुपारी अचानक ते आसोदा रेल्वेगटजवळील खांबा क्रमांक 421/25-421/28 च्या दरम्यानातील रेल्वे रूळावर आले. नंतर त्यांनी स्वत:ला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधक एस.एस.ठाकूर यांनी शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश गव्हाळे व रवींद्र पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याठिकाणी त्यांना डायरी मिळून आल्याने त्यांनी त्यातील एका क्रमांकावर फोन लावून संपर्क साधला असता, तो क्रमांक यशवंत चौधरी यांच्या पत्नीचा निघाला.

जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास यशवंत चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी नातेवाईकांची गर्दी झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी मिनाक्षी, मुलगा सौरभ तसेच मुलगी पुजा रडे असा परिवार आहे. याप्रकरणी रेल्वे उपस्टेशन प्रबंधक एस.एस.ठाकूर यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com