लॉकडाऊनच्या निर्बंधातून एकल दुकानांना सूट

अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मुभा; मॉर्निंग वॉकलाही परवानगी
लॉकडाऊनच्या निर्बंधातून एकल दुकानांना सूट

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यांचा पॉझिटिव्ही रेट दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्या जिल्ह्यात निर्बंधांमध्ये शिथीलता देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे आदेश काढले.

यामध्ये व्यापारी संकुल वगळता इतर एकल दुकानांना शिथीलता देण्यात आली आहे. त्यांना व्यापारासाठी सकाळी 9 ते 2 पर्यंतची तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ देखील वाढवून देण्यात आली आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या नियमावली नुसार जिल्ह्यात संचारबंदीसह विशेष निर्बंधात 15 जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकानांना दररोज सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे.

तसेच स्वतंत्र ठिकाणी असलेली इतर प्रकारचे सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत सुरु राहतील तर अत्यावश्यक वस्तू व सेवांबाबत घरपोच डिलव्हरीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. सर्व प्रकारची केश कर्तनालये (सलून), स्पा सेंटर्स, जीम पूर्णपणे बंद राहतील.तर कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकाने ही दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

मॉर्निग वॉकसाठी सूट

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी, सायकलींग, खुल्या मैदानातील व्यायाम याकरीता प्रशासनाकडून सूट देण्यात आली आहे. पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत नागरिकांना सूट देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना 10 हजाराचा दंड

दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी किंवा काऊंटर समोर एकावेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानचालकांकडून 10 हजार दंड आकारण्यात येणार आहे.

तसेच आस्थापनांच्या ठिकाणी काम करणार्‍या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच या कर्मचार्‍यांना दर आठवड्याला कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

पारदर्शी शीट लावणे बंधनकारक

दुकानदारांनी दुकानांच्या दर्शनी भागात बँक काऊंटर प्रमाणे काच किंवा प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पडदा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी.

शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती

सर्व शासकीय कार्यालयात (आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यालये, पोलीस विभाग, अत्यावश्यक सेवा संबंधित कार्यालये वगळून) 25% कार्यालयीन उपस्थिती राहील.

...तर संसर्ग कमी होईपर्यंत राहणार सील

मान्सूनपूर्व शेतीची कामे करण्यासाठी तसेच शेतकर्‍यांना कृषी संबंधित सेवा पुरविणारी दुकानांना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंतची वेळ दिली आहे. तसेच माल वाहतुक सुरळीत करण्यासाठी दुपारी दोन नंतर माल भरण्यासाठी सूट दिली आहे. परंतु या वेळेत ग्राहकांना सेवा पुरविता येणार नसून आदेशाचे उल्लंघन केल्यास कोविड-19 चा संसर्ग कमी होईपर्यंत त्यांचे दुकाने बंद ठेवली जातील.

रस्त्यावरील हॉकर्सना बंदी

भविष्यात जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10 % किंवा अधिक झाल्यास व ऑक्सिजन बेडची उपलब्धता 40 % पेक्षा कमी झाल्यास सदरच्या आदेशात नव्याने सुधारणा केली जाईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांची व त्या ठिकाणी खरेदी साठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने शहरातील गर्दी होणार्‍या अशा ठिकाणी रस्त्यांवर, हातगाडीवर वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com