
जळगाव - Jalgaon
शहरातील महावितरण कंपनीच्या गाळणी कक्षाच्या आवारातून केबल चोरणार्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील महावितरण कंपनीचे गाळणी कक्षाच्या आवारातून दोन चोरट्यांनी इलेक्ट्रिक डीपीला लागणारे केबल चोरून नेत असतांना महावितरण विभागाच्या कर्मचार्यांच्या लक्षात आल्याची घटना दि. 27 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आली. सहाय्यक अभियंता संदीप निरंजन, मुख्य तंत्रज्ञ अतुल मार्कड, तंत्रज्ञ निलेश पर्वतकर, प्रधान तंत्रज्ञ हिरासिंग चौहाण यांनी दोन्ही चोरट्यांचा पाठलाग केला. चेतन केशव साळुंखे (रा. सदगुरू नगर, अयोध्यानगर) असे संशयित आरोपीचे नाव असून रात्री उशीरा त्याला अटक केली. अधिक चौकशी केली असता दुसरा संशयित आरोपी बाळू सैंदाणे असल्याचे सांगितले. त्यालाही मंगळवारी दुपारी अटक केली.
सहाय्यक अभियंता संदीप निरंजन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.कॉ. हेमंत कळसकर, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, योगेश पाटील, विजय बावस्कर, सचिन पाटील, मुकेश पाटील आदींनी केली.