जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पुणे येथील भोसरी भूखंडप्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसेंना उपस्थित राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.

परंतु खडसेंना कोरोनासदृष्य लक्षणे असल्याने त्यांनी चौकशीला वकीलामार्फत हजेरी लावली. परंतु ईडीकडून त्यांना चौकशीसाठी 14 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसेंना भोसरी भूखंडप्रकरणी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होणेबाबत सक्त वसुली संचालनालय (ई.डी) कडून समन्स बजाविण्यात आले होते.

त्यानुसार 30 डिसेंबर रोजी खडसे हे कागदपत्रांसह ई.डी.कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी जाणार होते. परंतु त्यांना ताप, सर्दी व कोरडा खोकल्याचा त्रास जाणवत होता.

वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोना सदृष्य लक्षणे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

त्यानंतर खडसेंची करोनाची चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

14 दिवस विश्रांतीच दिला सल्ला

खडसेंची प्रकृती बरी नसल्याने त्यांना वैद्यकिय अधिकार्यांंच्या सल्ल्यानुसार 14 दिवसांची विश्रांती आवश्यक आहे.

याबाबत त्यांच्या वकीलांनी ईडी कार्यालयात पत्राद्वारे माहिती दिली असून ईडीकडून देखील त्यांना हजर होण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ दिली असल्याची माहिती खडसेंनी दिली.