चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या आयशरला समोरून येणाऱ्या भरधाव टँकरने धडक दिल्याने या अपघातात आयशरचालकासह दोन जण ठार झाले. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर चाळीसगावपासून काही अंतरावर रात्री 11 वाजेच्या सुमारास हा भिषण अपघात झाला, अपघातात...

अरूण नारायण पाटील, बापु भिला बोरसे अशी मयतांची नावे आहेत. अपघातात आयशरमधील इतर मजुरही किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे . याप्रकरणी टँकर चालकाच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय विजयसिंग पाटील रा. राणीचे बांबरूड ता. पाचोरा हे उसतोड मुकदमा असून पारगाव ता. दौड येथील अनुराज साखर कारखान्यास ते मजुर पुरवतात. गुरुवार दि.27 रोजी रात्री 9 वाजता संजय पाटील हे पाचोरा येथील अरूण पाटील यांच्या मालकीची एमएच.43 यू.4344 ही आयशर घेऊन भटगाव ता. भडगाव येथील मंगल सोनवणे, लक्ष्मीबाई सोनवणे, भारती सोनवणे, उषा सोनवणे, दीपक सोनवणे व इतर मजुरांना घेऊन चाळीसगाव ते नांदगाव मार्गे अनुराज साखर कारखान्याकडे जात असतांना रात्री 11.20 वाजेच्या चाळीसगावपासून काही अंतरावर नांदगावकडे जातांना हॉटेल नक्षत्रच्या पुढे लक्ष्मीवाडीजवळ नांदगावकडून चाळीसगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच.15 ईजी.4876 या टँकरने त्याची साईड सोडून आयशरला जोरदार धडक दिली. त्यात आयशर गाडीचालक अरूण नारायण पाटील व बापु भिला बोरसे हे जबर जखमी झाले. आयशरमधील उसतोड मजुरांना आसपासच्या गावकऱ्यांना मदतीसाठी बोलावून या दोघा जखमींना आयशरच्या केबिनमधून बाहेर काढले. दोघा जखमींना रूग्णावाहीकेद्वारे ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. त्यात बापु भिला बोरसे यांचा मृत्यु झाले तर दुसरे जखमी अरूण पाटील यांना देवरे हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता डॉ्नटरांना अरूण पाटील यांना तपासून मयत घोषीत केले.अपघातात इतर उसतोड मजुरही किरकोळ जखमी झाले.

टँकर व आयशरची धडक इतकी जोरात होती की दोन्ही वाहनांचे जबर नुकसान झाले. तर दोघांचा मृत्यु झाला. याप्रकरणी संजय विजयसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरचालक गुड्डू मांगुलाल मौर्या मुपो. प्रणव इस्टेट काजू खोरे, ता.सिन्नर जि. नाशिक याचे विरूद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम 304अ, 279, 337, 338, 427 व मोटार वाहन अधिनियम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.