जावयाच्या अटनेनंतर एकनाथराव खडसेंना ईडीचे समन्स

भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : खडसे कुटुंबिय मुंबईत ठाण मांडून
जावयाच्या अटनेनंतर एकनाथराव खडसेंना ईडीचे समन्स

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल मंगळवारी रात्री ईडीने अटक केली आहे.

न्यायालयात हजर केले असता, गिरीश चौधरी यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईनंतर एकनाथराव खडसेंना ईडीने समन्स बजाविले असून उद्या दि. 8 रोजी चौकशीसाठी बोलविले आहे. त्यामुळे खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे या कारवाईनंतर खडसे कुटुंबिय आज बुधवारी सकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांचा संपर्क क्रमांक नॉट रिचेबल येत होता.

माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे जावई गिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली.

चौकशीनंतर ईडीकडून गिरीश चौधरी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याआधी ईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.

काय आहे प्रकरण

खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सर्व्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली.

अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले. एकनाथ खडसे याआधी राज्याचे महसूल मंत्री होते. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला होता.

ईडी लागली... आता सीडी लागेन काय ?

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपाने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता.

खडसेंच्या जावयाला ईडीने अटक केल्याने, एकप्रकारे खडसेंच्या मागे ईडी लागली आहे. तर दुसरीकडे गतकाळात इशारा देणारे खडसे आता खरोखर कथीत सीडी लावतील का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com