मार्चमध्येच मे हिटचा तडाखा

जिल्ह्याचे तापमान चाळिशीवर
मार्चमध्येच मे हिटचा तडाखा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यासह शहरातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले असून आज जळगाव शहराचे तापमानाने चाळीशी गाठली असल्याने दुपारच्या सुमारास अंगाची चांगलीच लाहीलाही होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

देशात सर्वात उष्ण जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. राज्यात सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात असल्याने अनेकांना जळगावचा उन्हाळा सहन देखील होत नाही.

यंदा हिवाळ्यात देखील जळगावच्या तापमानात घट होवून 7 अंशापर्यंत गेला असल्याने जळगाव शहर गारठले होते.

परंतु हळू हळू थंडी कमी होवून शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. होळीच्या सणानंतर उन्हाचे तिव्र चटके जाणवत असतात परंतु यंदा होळीपूर्वीच मार्च महिन्यातच दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याने जळगावरांना उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल लागली आहे.

ठिकठिकाणी थाटली रसवंती, मठ्ठ्याची दुकाने

शहराच्या तापमानात वाढ होताच शहरात ठिकठिकाणी उसाचा रस, मठ्ठा, पन्हे विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. तसेच गल्लोगल्ली उसाचा रस विक्रेते त्याची विक्री करु लागले असल्याने नागरिकांकडून देखील त्याची मागणी केली जात आहे.

दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य

सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने दुपारनंतर पुन्हा तापमानात वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान 40 अंश सेल्ससियसपर्यंत पोहचल्याने दुपारनंतर शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com