खते वापरात जिल्हा देशात अव्वल

मुख्यमंत्र्यांच्या मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत माहिती
खते वापरात जिल्हा देशात अव्वल
खते

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात पीक लागवड करण्यापासून ते पिकांची वाढ होईपर्यंत सर्वात जास्त रासायनिक खतांचा भरमसाठ वापर करण्या येत असल्याने जमीनीचा पोत खराब होत आहेत. त्यामुळे उत्पादन क्षमतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

मागील वर्षी साडेपाच लाख मेट्रीक टन रासायनिक खते वापरण्यात जळगाव जिल्हा देशात अव्वलस्थानी होता,अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी मुख्यमंत्री आढावा बैठकीत गुरुवारी दिली.

31 मे पर्यंत पाऊस केरळमध्ये धडकणार असल्याने महाराष्ट्रात 7 ते 8 जूनपर्यंत पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मागील वर्षी साडेपाच लाख मेट्रीक टन रासायनिक खते वापरण्यात आली असून त्याचा वापर कमी करावा आणि पीएसबी, केएसबी, ट्रायकोडर्मा यासह बियाण्यांवर बिजप्रक्रिया करुन त्याचा वापर वाढवावा. तसेच बाजारातून आणलेल्या बियाण्यांवर बिज प्रकिया करुनच पेरणी केल्यास रासायनिक खतांचा वापर कमी होईल.

संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,जळगाव

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना पीक कर्जासह खते, बी-बियाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले होते.

साडेसात लाख हेक्टर क्षेत्र

यंदाच्या खरीप हंगामासाठी शेती नांगणीसह मशागतीच्या कामाला वेग आला आहे. मान्सूपर्व हालचाली सुरु झाल्याने शेतकर्‍यांनी शेती मशागतीची काम पूर्णत्वाकडे आली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा कृषी विभागाकडूनही खरीप हंगामाचे नियोजन काय आहे. बि-बियाणे, खते मुबलक प्रमाणात आहेत की नाही याविषयी मुख्यमंत्र्यांनी जळगावसह इतर जिल्ह्याचा आढावा घेतला.

यात जळगाव जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक असून 5 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात येणार असून सर्वाधिक जास्त कापसाची लागवडीचे राहणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे झालेल्या आढावा बैठकीत जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, बीज उत्पादन विभागाचे मधुकर चौधरी आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

सोयाबीनचा 30 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा

येत्या खरीप हंगामात सोयाबीन 30 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. कापूस 5 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येईल.

ज्वारी 40 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. मका लागवड 75 हजार हेक्टर क्षेत्रावर तर मूग 22 ते 23 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. तूर 15 हजार हेक्टर तर उडीद 20 ते 22 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com