हॉकर्स-मनपाच्या पथकात वाद

शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्‍या तिघांविरुध्द गुन्हा दाखल
हॉकर्स-मनपाच्या पथकात वाद

जळगाव - Jalgaon :

फुले मार्केट परिसरात हॉकर्सला विक्री करण्यास मनपा प्रशासनाने मनाई केली आहे. तरीदेखील हॉकर्स स्टॉल लावत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली.

त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने मंगळवारी कारवाईची मोहीम राबवून काही हॉकर्सचे साहित्य जप्त करुन ट्रॅक्टरमध्ये ठेवले. मात्र, शासकीय कामात अडथळा आणून जप्त केलेला माल हॉकर्सने परत घेवून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्‍वभूमिवर लावण्यात आलेल्या निर्बंधात शिथीलता देवून लॉकडाऊन अनलॉक करण्यात आला आहे. परंतू, हॉकर्सला दिलेल्या पर्यायी जागेवर व्यवसाय न करता, फुले मार्केट परिसरात दुकाने थाटून विक्री करीत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनपा प्रशासनाच्या अतिक्रमण निर्मुलन विभागाची गेल्या काही महिन्यांपासून कारवाईची मोहीम सातत्याने सुरु आहे. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, नितीन भालेराव, राहूल कापडे, नाना कोळी, गुलाब चौधरी यांच्यासह पथक मंगळवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फुले मार्केट परिसरात कारवाईसाठी गेले होते. हॉकर्सवर कारवाई करतांना, हॉकर्स आणि महापालिकेच्या पथकात जोरदार वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मनपा कर्मचारी गुलाब चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मनपाचे पथक दिसताच हॉकर्सची पळापळ

महापालिकेचे पथक कारवाईसाठी पोहचताच हॉकर्सची पळापळ सुरु झाली. दरम्यान, काही हॉकर्सचे साहित्य पथकाने जप्त करुन महापालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये ठेवले. त्याचवेळी हॉकर्सने ट्रॅक्टरमध्ये ठेवेले साहित्य काढून घेत, मनपाच्या पथकाशी वाद घातला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com