नगरविकास मंत्री आले तरीही निराशाच

प्रथमच आले होते जळगाव जिल्हा दौऱ्यावर
नगरविकास मंत्री आले तरीही निराशाच
नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

सप्ताह घडामोडी : डॉ. गोपी सोरडे

जळगाव - Jalgaon

जळगाव मनपात (Jalgaon Municipal Corporation) भाजपची (BJP) सत्ता होती. मात्र अडीच वर्षात भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या पाठिंब्यावर सत्ता परिवर्तन होवून शिवसेनेच्या ताब्यात आली.या राजकीय घडामोडीत आणि सत्तांतरासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांचा महत्त्वाचा रोल होता. काही दिवसापूर्वी महापौर, उपमहापौर आणि काही बंडखोर नगरसेवक त्यांना मुबंईला भेटून आले होते. त्याचवेळी त्यांनी जळगाव भेटीबाबत सुतोवाच केला होता. त्यानुसार ते प्रथमच जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी सांयकाळी धावती भेट देवून मनपाचा आढावा घेतला.

नगरविकास मंत्री म्हणून शहर विकासाच्या अनुषंगाने काही आश्वासक घोषणा करतील अशी अपेक्षा होती.मात्र तसे काहीही झाले नाही.त्यामुळे जळगावकरांच्या वाटेला पुन्हा निराशाच पदरी पडली.

जळगाव शहरासह जिल्ह्याचा ‘विकास’ हरवलाय की काय ? अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात शाश्वत विकासाच्याबाबतीत शेवटचा क्रमांक लागतोय की काय? असा दावा केला तरी नवल वाटण्यासारखे काही नाही.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे हे प्रथमच जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी मनपात शासकीय बैठक घेतली. त्यावेळी जिल्ह्याच्या विकासाचा अनुषेश भरुन काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना.गुलाबराव पाटील यांनी व्यथा मांडली.जवळपास 251 कोटींची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे साहजिकच वाटले होते की, नगरविकास मंत्री आले तर भरभरुन काही तरी देवून जातील.मात्र त्यांनी कुठलिही ठोस अशी भूमिका मांडली नाही.उलटपक्षी मनपा आणि नपा प्रशासनाचे कान टोचून मोकळे झालेत.

जळगाव महानगरपालिकेतील हुडको कर्ज, गाळ्यांचा प्रश्न गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे. हे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले तर जळगाव शहराच्या रखडलेल्या विकासाला कुठेतरी गती येईल,यात तिळमात्र शंका नाही. पंरतु हुडको प्रश्नाबाबत नगरविकास मंत्र्यांनी एक अवाक्षरही काढले नाही.आणि गाळ्यांच्या प्रश्नावर निश्चित भूमिका जाहीर न करता धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगून मोकळे झाले. एकीकडे जळगाव शहरातील रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेवून शहरातील रस्ते सुस्थितीत आणावे लागतील असे ना.शिंदे म्हणाले खरे,पण त्याबाबत निश्चित घोषणा न करता मंजूर झालेल्या 100 कोटींपैकी 42 कोटींचा निधी रिलिज केला जाईल असे राजकीय आश्वासन देवून रवाना झालेत. अर्थात नगरविकासमंत्र्यांनी जळगावकरांसह जिल्हावासीयांचा हिरमोड केला,ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.

मो.नं. 9834166072

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com