उंचीच्या निर्बंधामुळे कारागिरांची अडचण
जळगाव

उंचीच्या निर्बंधामुळे कारागिरांची अडचण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन 15 दिवसांवर येवून ठेपले आहे. कोरोनाची महामारी आणि गणेशोत्सवासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करीत लाडक्या बाप्पाच्या मुर्त्यां तयार करण्याचे काम वेगात सुरु झाले आहे. असे असलेतरी राज्यशासनाने मुर्त्यांच्या उंचीबाबत घालुन दिलेल्या निर्बंधांमुळे कारागिरांची मात्र चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध आले असतांना यातुन महाराष्ट्राची शान असलेला गणेशोत्सवदेखील सुटलेला नाही. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिकमंडळांभोवती होणारी गर्दी, देखावे बघण्यासाठी येणारे लोक आणि त्यातून होणारा संभाव्य संसर्ग लक्षात घेवून राज्य शासनाने गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्यातील गणेशभक्त तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. त्यासोबतच गणेशोत्सव घरगुती पध्दतीने साजरा करण्याच्या सूचना केल्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली असली तरी, 15 दिवसांवर येवून ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल सर्वत्र लागलेली दिसून येत आहे.

मुर्तीकार सद्या मुर्त्या बनविण्याच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी किमान तीन महिने आधी मुर्ती तयार करण्याच्या कामाला वेग यायचा यंदा मात्र कोरोनामुळे गणेशोत्सवावर अनिश्चिततेचे सावट असल्याने मुर्त्या तयार करण्याच्या कामाला उशिरा सुरुवात झाली. राज्य शासनाने निर्बंध घालतांना गणेश मुर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक नको, असे सांगितलेले असल्यामुळे चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मुर्त्या तयार करण्याचे काम मुर्तीकारांनी हाती घेतलेले आहे.

आधिच कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात असतांनाच मोठ्या मुर्त्या तयार करण्यातून मिळणारा जास्तीचा मोबदलादेखील यंदा मुर्तीकारांना मिळणार नसल्याची परिस्थती आहे. त्यामुळे छोट्या मुर्त्यांमधून मिळणार्‍या तुटपुंज्या नफ्यावर मुर्तीकारांना समाधनान मानावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. यामुळे आकाराने छोट्या असलेल्या मुर्त्यांची किंमत वाढून त्याचा भार भक्तांवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com