पुरेशा मनुष्यबळाअभावी उपचारात येताय अडचणी
जळगाव

पुरेशा मनुष्यबळाअभावी उपचारात येताय अडचणी

केंद्रीय समितीकडे अधिष्ठातांनी मांडली समस्या

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात पुरेशा मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवेत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही मुख्य समस्या अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केंद्रीय समितीकडे मांडली. तसेच या रुग्णालयात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही डॉ.रामानंद यांनी समितीकडे केली.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात देखील रविवारी दुपारी पाहणी केली. समितीने आरोग्य सेवा, उपाययोजना आदीबाबत आढावा घेतला.

या समितीमधील नवी दिल्लीतील गृहनिर्माण मंत्रालयातील सहसचिव कुणाल कुमार, नागपूर येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अरविंद कुशवाह, प्रा.डॉ.सितीकांत बॅनर्जी प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.

या रुग्णालयामध्ये एकूण 350 बेड आहेत. यातील 255 बेडवर सेंट्रललाइज ऑक्सिजन आणि 101 बेडवर सिलेंडरची सुविधा आहे. अगोदर फक्त सहा व्हेंटीलेटर होते. आता 87 व्हेंटीलेटर असून अजून 13 व्हेंटीलेटर उपलब्ध होणार आहेत. फोर्टेबल एक्स रे मशीन 3 असून अल्ट्रासाऊंड नवीन मशीन 2 प्राप्त झाले. या व इतर सुविधांची माहिती डॉ.रामानंद यांनी दिली.

वाढत्या मृत्यूबाबत चिंता

या रुग्णालयामध्ये नवीन 25 डॉक्टर, 50 नर्सिंग स्टाफ, 25 टेक्निशियन आदीची गरज असल्याचेही सांगण्यात आले. समितीने जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. मृतांमध्ये बहुसंख्य रुग्ण वयस्कर आणि त्यांना इतर आजार देखील आहेत. या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूसंदर्भात कारणामिमांसा झाली.

अपडेट नॉलेज

समितीने रुग्णांना मिळणार्‍या औषधोपचाराबाबत आढावा घेतला. कोरोनावरील उपचारांबाबत अनेक नवनवीन प्रयोग, नवीन औषध, संशोधन आदींची वैद्यकीय अधिकार्‍यांना अपडेट माहिती आहे किंवा नाही? याबाबतही समितीने डॉक्टर व इतर कर्मचार्‍यांची अप्रत्यक्षरित्या चाचपणी केली. यासंदर्भात संबंधितांना वेळोवेळी किंवा महिन्यात एक अथवा दोन वेळा अपडेट नॉलेज देण्यात येतेे, असेही डॉ.रामानंद यांनी सांगितले.

या केल्या सूचना

जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधणे, त्यांच्या तातडीने तपासण्या करण्यात याव्या. त्यांचे लवकरात लवकर रिपोर्ट प्राप्त व्हावे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या कॉन्टॅक्टमधील संशयितांचा त्वरित शोध घ्यावा. कामकाजातील अडचणी वरिष्ठ पातळीवर त्वरित मांडून त्या सोडवण्याला प्राधान्य द्या आदी सूचना समितीने वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या. समितीने रुग्णालयातील नवीन बांधकाम, औषधसाठा, यंत्रसामुग्रीची माहिती घेतली. तसेच रुग्णालयातील बेड साइड असिस्टंट संकल्पनेचे कौतुक देखील केले.

Deshdoot
www.deshdoot.com