ऊसाची थकीत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा

आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश
ऊसाची थकीत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

गेल्या ६ महिन्यांपासून थकीत असलेल्या रावळगाव येथील ऊस देयकाची रक्कम शेतकर्‍याना मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एकत्र आणत थकीत देयकांसाठी आर-पारच्या लढाईचा इशारा दिला होता. शेतकर्‍यांनी देखील एकजूट दाखवत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार्‍या आंदोलनात सहभागी होण्याचा निश्चय केला होता. अखेर शेतकर्‍यांची एकजूट व आमदार मंगेश चव्हाण यांच्या दणक्यापुढे रावळगाव येथील एस जे शुगर कारखाना प्रशासन नमले असून आज दि.२१ जून रोजी ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या खात्यात ३० ते ५० टक्के पर्यंत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

तालुक्यातील शेतकर्‍यांचे ६ महिन्यांपासून एक रुपयाही देत नसल्याने रावळगाव कारखाना प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत तालुक्यातील शेकतर्‍यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे व्यथा मांडली होती. आमदार मंगेश चव्हाण हे काही शेतकर्‍यांना घेवून थेट रावळगाव कारखान्याचे मालक आमदार भाई जयंत पाटील यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी गेले, व त्याठिकाणी शेतकर्‍यांची व्यथा मांडली. त्यानतंर १५ दिवसात थकीत पेमेंट न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच शेतकर्‍यांचे थकीत मिळण्यासाठी पाठपुरवा सुरु होता. त्याचा परिणमा म्हणून उशिरा का होईना, शेतकर्‍यांच्या रेट्यापुढे कारखाना प्रशासनाला नमते घ्यावे लागले व काही प्रमाणात का होईना शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे.

शेतकर्‍यांनी वर्षभर पोटाच्या पोराप्रमाणे जतन केलेल्या उसाचे थकीत देयके घेण्यासाठी गेल्या ६ महिन्यांपासून शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. शेतकर्‍यांनी देखील संयम पाळला व प्रसंगी सावकारी कर्ज काढून मुलांची लग्ने, खरीप पेरणी केली. त्यामुळे शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा शेवटचा एक रुपया देखील कारखान्याने थकीत ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. तसेच दोन दिवसांपुर्वी मालेगाव तहसीलदार यांनी रावळगाव कारखान्याच्या साखरेच्या गोडाऊनला सील केले तेव्हा एफआरपी प्रमाणे २३०० रुपयाहून अधिक रक्कम प्रतिटन प्रमाणे निघाली असून त्यावरील शासन नियमाप्रमाणे व्याज अशी सर्व रक्कम शेतकर्‍यांना मिळाली पाहिजे. शेवटच्या शेतकर्‍याचा शेवटचा रुपया निघेपर्यंत हा लढा सुरू राहील. नेमकी किती रक्कम ते आता देणार आहेत व उर्वरित रक्कम याबाबत कारखाना प्रशासनाची काय भूमिका आहे हे शेतकर्‍यांच्या सोबत जाणून घेतल्यानंतर पुढील भूमिका व आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com