पावसाच्या हुलकावणीमुळे जिल्ह्यातील पाणीसाठा घटतोय

जिल्ह्याला पाणी पुरवठा करणार्‍या प्रकल्पांमध्ये केवळ 31.76 टक्के पाणीसाठा
पावसाच्या हुलकावणीमुळे जिल्ह्यातील पाणीसाठा घटतोय

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पावसाळा सुरु झाला असला तरी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जुलैच्या पहिला आठवड्यातही पाऊस नसल्याने जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे.

जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांसह तेरा मध्यम व 96 लघु प्रकल्पांचा, प्रकल्पीय उपयुक्त साठा हा 50.406 टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये आजमितीस अवघा 16.01 टीएमसी म्हणजेच 31.76 टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी हा साठा 39.95 टक्के इतका म्हणजेच 8.19 टक्के इतका अधिक होता.

यंदा जिल्ह्यात मान्सून जून महिन्याच्या पहिल्याचा आठवड्यात दाखल झाला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतीच्याकामाला गती आली होती. अनेकांनी पेरण्या देखील केल्या होत्या.

मात्र जुलै महिन्यात पावसाने ओढ दिसल्याने प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. तसेच जिल्ह्याला वेगवेगळ्या प्रकल्पांमधून पाण्याचा पुरवठा केला जात असतो. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्ह्यात असलेल्या प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी कमी होत आहे.

यात जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात अवघा 13.25 टीएमसी उपयुक्त साठा असून यात हतनूर 1.60 टीएमसी, गिरणा 6.16 टीएमसी तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. तर तेरा मध्यम प्रकल्पांमध्ये 2.20 टीएमसी, 96 लघु प्रकल्पात 0.56 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे.

सुकी, भोकरबारी धरणात अधिक पाणीसाठा

जिल्ह्यातील सुकी आणि भोकरबारी धरण क्षेत्रात यावर्षी साधारण पाऊस झाल्याने या धरणातील साठा हा मागील वर्षीपेक्षा अधिक असल्याचे उप कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग यांनी सांगितले. त्यामुळे या धरणातून ज्या गावांना पाणीपुरवठा केला जातो त्यांना पाणी कपातीचे संकट ओढावणार नाही.

प्रकल्पांमधील साठा

जिल्ह्यातील हतनूर धरणात 1.60 टीएमसी (17.73%), गिरणा धरणात 6.16 टीएमसी (33.31%) तर वाघूर धरणात 5.50 टीएमसी (62.66%) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर जिल्ह्यातील अभोरा मध्यम प्रकल्पात 66.77%, मंगरुळ 46.17%, सुकी 72.21%, मोर 54.02%, तोंडापूर 41.93%, बहुळा 19.93%, अंजनी 19.31%, गुळ 26%, मन्याड 17.47% तर भोकरबारी धरणात 15.12% उपयुक्त साठा शिल्लक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com