कोरोना झिंगाट : प्रशासन चिंगाट

अमळनेरच्या बेपत्ता रुग्णाचा मृत्यू
कोरोना झिंगाट : प्रशासन चिंगाट
मयत बापू निंबा वाणी

अमळनेर - Amalner :

येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या 65 वर्षीय वृध्दाचा विचखेडा, ता. पारोळा येथे अपघाती मृत्यूची घटना घडल्याचे निष्पन्न झाले. यामुळे जिल्हा प्रशासन हादरले आहे. सदर इसम कोविड सेंटरमधून गायब झालाच कसा ? याबाबत उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांना माजी आ. स्मिता वाघ यांनी चांगलेच धारेवर धरले. बापू निंबा वाणी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शहरात हातमजुरी करणारे बापू निंबा वाणी यांचे स्वॅब घेण्यापूर्वीच ते तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्याने त्यांचा पुतण्या मंगेश वाणी याने माजी आ. स्मिता वाघ यांच्याकडे कैफियत मांडली होती.

मंगेश दगडू वाणी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा यांना 6 जुलै रोजी कोविड सेंटरला दाखल केले होते. त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि ते व मुलगा निगेटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, परिवारातील बापू निंबा वाणी हे हमालीसाठी बाहेर गेलेले होते म्हणून त्यांचा स्वॅब घेण्यात आले नव्हते. पालिकेमधून वारंवार स्वॅब घेण्यासाठी कोविड सेंटरला आणा, म्हणून फोन येत होता. म्हणून मंगेश वाणी यांनी 9 रोजी बापू वाणी यांना कोविड सेंटरला दाखल करून त्यांची नोंदणी करून त्यांना रूम नंबर 68 मध्ये बसवून आले होते.

11 रोजी ते काकांची विचारपूस करायला गेले असता त्यांना ते आदल्या दिवसापासून ते शनिवार दुपारपासून गायब असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत मंगेश वाणी यांनी विचारले असता, तेथील लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याची तक्रार केली होती. आम्हाला माहीत नाही, ते काम पोलीस प्रशासनाचे आहे, आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवू? असे सांगितले. मुलाला सोबत घेऊन काकांचा शोध घेतला मात्र प्रशासन उत्तरे नीट देत नसल्याने मंगेश वाणी यांनी माजी आ. स्मिता वाघ यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यावरून वाघ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना तक्रार करून उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला बंदोबस्त ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे, प्रताप महाविद्यालयातून बाहेर जाण्यासाठी एकमेव रस्ता असूनदेखील वृद्ध बाहेर जातो कसा? पोलिसांचे लक्ष नव्हते की, पोलीस बंदोबस्ताला नव्हते. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यापूर्वीदेखील काही रुग्ण दाखल असताना घरी निघून जात होते. जळगाव येथे जसा प्रकार घडला तसा घडू नये, अशी भरती आ. वाघ यांनी व्यक्त केली होती व दुर्दैवाने तसेच घडले.

प्रशासन त्यांचा शोध घेत असून काल ते गलवाडे येथे एकाला दिसल्याचे दुपारी प्रांत सीमा अहिरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. जर तो इसम गलवाडे जैतपीरकडे दिसला तर तो पारोळ्याकडे पोहोचलाच कसा? प्रशासनाच्या दृष्टीन कडक लॉकडाऊन असल्याने कुठलेही वाहन ये-जा करणारे नव्हते मग महामार्गावर कसा गेला? हे प्रश्न अनुत्तरित राहतात. कोविड सेंटरला दाखल व्यक्ती गायब होऊन त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अ‍ॅडिशनल एस.पी. गोरे यांनी अमळनेरला रात्री उशिरा भेट दिली व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची झाडाझडती घेतली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com