सोमवारपासून जिल्ह्यात पंधरा दिवस 11 वाजेनंतर कर्फ्यु

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गल्लीबोळातील विक्रेत्यांवरही होणार कडक कारवाई
सोमवारपासून जिल्ह्यात पंधरा दिवस 11 वाजेनंतर कर्फ्यु
Curfew

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असून गर्दी करीत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने जिल्ह्यात सोमवार पासून पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन राहणार आहे.

यामध्ये गल्ली बोळांत भाजीपाला, फळ विक्रेत्यांसह दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, उपायुक्त संतोष वाहुळे उपस्थित होते.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने याबाबत संपुर्ण शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. यामध्ये अत्यावश्य सेवेसाठी नागरिकांना मुभा दिली. परंतु नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहे. यातच भाजी व फळ विक्रेत्यांकडे प्रचंड गर्दी होत आहे. यातच कोविड सेंटर व रुग्णालयात नागरिक थेट रुग्णाजवळ जात असल्याचे दिसून येत आहे.

तसेच लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने त्यामुळे देखील कोरोनाचा प्रसार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासठी बे्रक द चैनला 1 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. या पंधरा दिवसात शहरात सकाळी 11 वाजेनंतर कडक निर्बध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहे.

सकाळी 11 नंतर लागणा कर्फ्यु

ब्रेक द चेन अंतर्गत जिल्हा प्रशानाकडूप क्रॅक डाऊन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना सकाळी 7 ते 11 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. मात्र नागरिक तरी देखील मेडीकलची चिठ्ठी घेवून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांना ज्या अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची आहे त्यांनी ती 11 वाजेच्या आत करावी. 11 वाजेनंतर जिल्ह्यात कर्फ्यु सदृष्य परिस्थिती निर्माण केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.

रिक्षाचालकांवरही होणार कारवाई

जिल्हातंर्गत प्रवासी वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. मात्र प्रवासी रिक्षाचालकांकडून रिक्षामध्ये पारदर्शक फिल्म लावणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्याकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आरटीओ व पोलिस दलाकडून अशा रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी सांगितले.

...तर गर्दी करणार्‍या विक्रेत्यांवर होणार कारवाई

शहरातील ठराविक ठिकाणी येवून भाजीपाला व फळांची विक्री करणार्‍यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवस अशा ठिकाणांवर पोलिसांसह मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाणार आहे. विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी जावून त्यांची आपल्या मालाची विक्री करावीत. ज्या विक्रेत्यांकडून नियमांची अंमलबजावणी केली जाणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे देखील दाखल केली जाणार असल्याचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले.

कुपन असणार्‍यांनाच मिळणार लस

पुढील पंधरा दिवसात नागरिकांनी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक असून नागरकांनी ते केल्यास जून महिन्यात कोरोनाची ही दुसरी लाट रोखण्यास नक्कीच मदत होईल. अन्यथा तिसर्‍या लाटेचा सामना जळगावकरांना करावा लागणार आहे. तसेच लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी केंद्रचालकांकडून एक दिवस अगोदरच नागरिकांना कुपनचे वाटप करणे गरजेचे आहे. तसेच ज्या नागरिकांकडे कुपन आहेत त्यांचेच लसीकरण होणार असून नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com