वीकेंड लॉकडाऊन संपताच बाजारपेठेत उसळली गर्दी

गुढी पाडव्याची बाजारपेठ धोकादायक ठरण्याची शक्यता
वीकेंड लॉकडाऊन संपताच बाजारपेठेत उसळली गर्दी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बे्रक द चैन साठी शासनाकडून वीक एन्ड लॉकडाऊन लावण्यात आला होता. तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण म्हणजेच गुढीपाडव्याचा सण अवघ्या एक दिवसावर येवून ठेपला आहे.

या सणाची खरेदी करण्यासाठी सोमवारी सकाळी लॉकडाऊन संपताच सकाळपासून व्यापार्‍यांसह नागरिकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली.

या गर्दीत अनेक जण विनामास्क व सोशल डिस्टन्सींगचे नियम धाब्यावर बसविल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाकडून जी उपाय योजना केली जात आहे ती कशी तुटणार असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून बे्रक द चैनची घोषणा केली आहे. यात आठवड्याभरात अत्यावश्यक सेवा वगळता शुक्रवारी सायंकाळपासून ते सोमवारी सकाळपर्यंत इतर संपुर्ण अस्थापना, कार्यालये संपुर्ण बंद करुन कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

विकेन्ड लॉकडाऊनच्या अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाने काढले होते. नागरिकांनी दोन दिवस विकेन्ड लॉकडाऊनची पूर्णपणे अंमलबजावणी केली मात्र लॉकडाऊन संपताच व्यापार्‍यांसह नागरिक प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्याने बाजारपेठेत सकाळपासून नागरिकांची गर्दी दिसून आली.

चोरी चोरी छुपके छुपके दुकाने सुरु

शासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापार बंद आहेत. मराठी नवीन वर्ष असणारा सण गुढीपाडव्याचा सण उद्यावर येवून ठेपला आहे. नारिकांकडून या सणाची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली जात आहे.

मात्र दुकाने बंद असल्याने नारिकांची फरफट होत आहे. परंतु अनेक दुकानादारांनी व्यापारी संकुलांमध्ये ठाण मांडले होते. त्यांच्याकडून दुकाने खुली न करता ग्राहक आल्यानंतर त्यांनी केलेल्या वस्तू दुकानातून काढून देत होते. तर काही दुकानदार थेट ग्राहकांना दुकानातच घेवून जात असल्याने सणाच्या पुर्वसंध्येला चोरी चोरी छुपके छुपके व्यापार सुरु होता.

नागरिकांचा बेशिस्तपणाच रुग्ण संख्या वाढीस कारणीभूत

गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांच्या रुग्णांची संख्या कमी होताच नागरिकांकडून सर्व नियम धाब्यात बसवून नागरिक विनामास्क वावरत होते. त्यानंतर लग्न सोहळ्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळल्याने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे.

ही लाट आधीपेक्षा अधिक तिव्र असल्याने मृत्यू होणार्‍यांची संख्या आधीपेक्षा अधिक आहे. परंतु तरी देखील जळगावकरांना अद्याप देखील या परिस्थितीचे गांभीर्य नसून नागरिक बिनधास्तपणे बाजारपेठेत गर्दी करीत आहे. त्यामुळे नागरिकांचा बेशिस्तपणाच कोरोनाची अशी गंभीर परिस्थती निर्माण करण्यास कारणीभूत ठरला आहे.

नागरिकांना अद्याप गांभीर्य नाही

विकेन्ड लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. पोलिसांकडून येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाची विचारपूस करुनच त्यांना सोडण्यात येत होते. परंतु लॉकडाऊन संपताच पोलिस देखील दिसेनासे झाल्याने नागरिकांना कोरोनाबद्दल अद्याप गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com