जिल्ह्यात तापमानवाढीसह अवकाळी पावसाचे संकट !

जिल्ह्याचे तापमान 43 अंशावर; असह्य उकाड्याने जळगावकर हैराण
जिल्ह्यात तापमानवाढीसह अवकाळी पावसाचे संकट !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

हवामानातील बदलामूळे जिल्ह्याच्या तापमानात देखील बदल होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे तापमान देखील वाढत असून आज यंदाच्या 43 अंश सेल्सियस इतक्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पुढील आठवड्याभरात जिल्ह्यात तापमान वाढीसह अवकाळी पावसाचे संकेत हवामानतज्ञांनी दिले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना यंदा तापमान वाढीसह अवकाळी पावसाचे संकटाचा सामना करावा लागणार आहे.

देशात सर्वात हॉट सिटी म्हणून जळगावची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान हे 48 अंश सेल्सियसपर्यंत नोंद झाली असल्याने तापमानवाढ आणि जळगाव असे एक समीकरणच निर्माण झाले आहे.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत आहे. पुढील काही दिवसात यात वाढ होणार आहे. तसेच हवामानातील बदलामूळे अवकाळी पावसाची शक्यता देखील आहे.

निलेश गोरे, हवामानतज्ञ, वेलनेस फाऊंडेशन

यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासीयांना उकाडा सहन करावा लागत आहे.

परंतु काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट देखील झाली होती. परंतु आठवड्याभरापासून जिल्ह्यच्या तापमानाने पुन्हा मुसंडी मारल्याने जिल्ह्याचे तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदविले जात आहे.

जिल्हावासीयांना तामपान वाढीचा करावा लागणार सामना

सकाळी 10 वाजेपासून तापमानाचा पारा वाढत असल्याने या वाढत्या तापमानामुळे जणू सुर्य आग ओकत आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्याच्या तापमानात वाढ होवून ते 45 अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे जळगाकवरांना यंदाही वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे.

यंदाची सर्वाधिक नोंद

जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळा जळगावकरांना सोसाव्या लागत आहे. आठवड्याभरपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने आज यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतच्या जिल्ह्यातील कमाल 43 तर किमान 25 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद हवामान तज्ञांनी केली आहे.

पुढील आठवड्यात पावसाची शक्यता

हवामानातील बदलामुळे उत्तरेकडील काही भागात प्री-मान्सूनपूर्व वारे वाहत आहेत. त्यामुळे ढगाळ वातावरणासह तापमान वाढ होत असल्याने जिल्ह्यात 28 एप्रिल ते 1 मे पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उन्हाळी पीके काढण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा एकदा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे उन्हाळी पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

गेल्या आठवड्याभरापासून दिवसागणिक तापमानाचा पारा वाढत असल्याने नोकरदारवर्ग घराबाहेर पडल्यानंतर डोक्याला रुमाल व कानाला टोपी बांधुनच ऑफिस व अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडत आहे. सकाळी 11 वाजेनंतर लॉकडाऊन तसेच वाढत्या तापमानाने रस्ते आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com