जळगाव : २५ हजारांच्या खंडणीप्रकरणी पत्रकारासह एका जणाविरुद्ध गुन्हा
जळगाव

जळगाव : २५ हजारांच्या खंडणीप्रकरणी पत्रकारासह एका जणाविरुद्ध गुन्हा

Balvant Gaikwad

जळगाव - दोन पोलिसांबाबत व्हॉट्सअपवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करुन 25 हजार रुपयांची खंडणी स्वीकारल्याप्रकरणी पत्रकार भगवान सुपडू सोनार आणि त्याचा मित्र हितेश आनंद पाटील याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांनी 29 रोजी दुपारी 2.40 वाजता अजिंठा चौफुलीजवळील हितेश मोटार्सच्या कार्यालयातील कॅबीनमध्ये केली.

याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यातील नाईक विश्वनाथ बाबुराव गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. क्रेझी कोटेज होम येथे 25 रोजी लग्नस्थळी गर्दी जमल्याचा फोन आल्यानंतर नाईक गायकवाड व रवींद्र पाटील चौकशीकामी तेथे गेले. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन होण्यासाठी क्रेझी कोटेज होमचे मालक चंद्रशेखर अनिल अग्रवाल यांना रामानंदनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यांच्या सोबत स्वयंपाकाचे टेंडर घेतलेले सचिन सोनार देखील गेले होते. पोलिसांनी अग्रवाल यांना समज देवून जावू दिले.

थोड्या वेळाने पत्रकार भगवान सोनार सुद्धा आले. त्यांनी लग्न समारंभाबाबतच्या कारवाईबद्दल विचारणा करुन अरेरावी केली. त्यानंतर पत्रकार सोनार यांनी 27 रोजी नाईक गायकवाड यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. तुमच्या सोबतचे नाईक रवी पाटील यांच्या नातेवाईकाचे लग्न 29 रोजी राधाकृष्ण मंगलकार्यालयात आहे. तेथील सोशल डिस्टन्सच्या नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

त्यानंतर पत्रकार सोनार यांनी व्हॉटसअपवर पोलिसांबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. दोघं पोलिसांमार्फत त्यांचे मित्र पूनम परदेशी व योगेश चौधरी यांच्यामार्फत गैरसमज दूर करण्यासाठी 28 रोजी पत्रकार सोनार यांना गोलाणी मार्केटमधील त्यांच्या कार्यालयात भेटले. या वेळी सोनार यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

परंंतु, पोलिसांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली नाही. त्यामुळे सोनार यांनी पुन्हा बदनामी केली. नंतर 25 हजारात तडजोडीबाबत चर्चा झाली. हा प्रकार दोघं पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पूनम परदेशी याच्याकडून 25 हजार रुपयांची खंडणी पत्रकार सोनार याच्या सांगण्यावरुन हितेश पाटील याने स्वीकारली. याप्रकरणी भगवान सुपडू सोनार (शिरसोली) आणि हितेश आनंद पाटील (शनिपेठ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com