अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार सुरू करावे-प्रा.पाटील
जळगाव

अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ट्रामा सेंटरमध्ये कोविड उपचार सुरू करावे-प्रा.पाटील

इतर केंद्रांवर पडतोय ताण, कोरोना योध्यांना विश्रांतीची गरज

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal

कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. शासन आणि प्रशासन सर्व उपाययोजना करून कोरोनाला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. भुसावळात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. गेल्या दि.२७ मे रोजी दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याठिकाणी ३० बेडची व्यवस्था करण्यात आली. भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरसाठी दोन एमबीबीएस डॉक्टरांसह ८ परिचारिका, १ वॉर्ड बॉय, १ फार्मासिस्ट असे बारा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच अतिरिक्त ४ डॉक्टर्स नियुक्त करण्यात आले होते.

त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात भुसावळकरांना जळगाव येथे उपचारासाठी जाण्याचा ताण वाचणार असा विश्वास होता. हे ट्रामा सेंटर कोविड उपचार केंद्र म्हणून लवकर सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे. निवेदनाची एक प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस. चव्हाण यांना देण्यात आली आहे.

ट्रामाच्या अनेक खोल्या बंद सुविधा धूळखात - भुसावळ परिसरात कोरोनाच्या संकटात सर्व मदार ही रेल्वे हॉस्पिटल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेंटर व इतर पालिकेच्या रुग्णालयावर आली आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टर, स्टाफ, ऑक्सिजन व मशिनरी यांची उपलब्धता आहे. विशेष म्हणजे आजतागायत येथे कोविड संबंधी एक उपचार सुरु झालेले नाही. येथे नियुक्त केलेले नोंदणी अधिकारी व फार्मासिस्ट सुद्धा उपलब्ध नसतात. खोल्या व उपचार सुविधा धूळ खात आहे तर औषधीसाठी स्वतंत्र नोंदणी नसून चार चाकी गाडीतच सर्व औषधी नवोदय विद्यालयाच्या आवारातून वितरीत केल्या जातात.

डॉक्टरांचा व यंत्रणेत काम करणार्‍यांचा ताण कमी करावा - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच वेगवेगळया शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोविडवर उपचार देणारे डॉक्टर्स व त्यांच्या परिवारातील सदस्य कोविड पॉझिटिव्ह होण्याची संख्या ही वाढत आहे. यामुळे, फक्त रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता भासत नाही तर, इतर डॉक्टरांवरही कामाचा अतिताण येत आहे, त्यांना विश्रांतीची गरज आहे म्हणून या कोविड रुग्णांना ट्रामा सेंटर येथे उपचार देऊन तेथील सुविधेचा उपयोग करावा. इतर डॉक्टरांचा व यंत्रणेत काम करणार्‍यांचा ताण कमी करावा, अशी मागणी केली आहे, असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com