न्यायालयीन कर्मचार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

खोटेनगरजवळील रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
न्यायालयीन कर्मचार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रावेर न्यायालयात नोकरीस असलेल्या कर्मचारी हितेंद्र हेमकांत कुलकर्णी (वय 47) यांनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील खोटेनगर परिसरातील रहिवासी हितेंद्र हेमकांत कुलकर्णी हे आई, पत्नी व दोन मुलींसह वास्तव्यास असून ते रावेर न्यायालयात नोकरीस आहे.

आज दुपारच्या सुमारास हितेंद्र यांनी खोटेनगरजवळील रेल्वे रुळावर धावत्यारेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यात त्यांना हितेंद्र यांचे ओळखपत्र आढळून आल्याने त्यांनी ओळख पटली. त्यानंतर पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कार्यालयात 15 टक्के उपस्थितीचे आदेश असल्याने हितेंद्र हे घरीच होते. हितेंद्र यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी दोन मुली असा परिवार असून ते अ‍ॅड. सुधिर कुलकर्णी यांचे बंधू होत.

वर्षभरात गमविले कुटुंबातील चार सदस्य

हितेंद्र कुलकर्णी यांचे कुटुंब उच्चशिक्षित असून कुटुंबातील बहुतांश सदस्य हे शासकीय सेवेत आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी 26 जानेवारी रोजी हितेंद्र यांच्या लहान भावाचे निधन झाले. त्यानंतर 17 मे रोजी वडीलांचे देखील अकस्मात निधन झाले तर मार्च महिन्यात त्यांच्या काकाचे देखील निधन झाले. दरम्यान आता हितेंद्र यांनी आत्महत्या केल्याने एकाच वर्षात कुटुंबातील चार जणांचे निधन झाल्याने कुलकर्णी कुटुंबावर मोठा आघात कोसळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com