5 हजाराचे कापसाचे बियाणे जप्त

अमळनेर तालुक्यातील दुकानमालकाविरुद्ध गुन्हा
5 हजाराचे कापसाचे बियाणे जप्त

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रीस बंदी असलेले अनधिकृत गुजरात येथील एचटीबीटी कापूस बियाणे आणून विक्री करणार्‍या अमळनेर शहरातील श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशन या दुकानांवर आज बुधवारी कृषि विभागाने कारवाई करुन 5 हजार रुपये किंमतीचे 5 कापूस बियाणे पाकिटे जप्त केले आहेत. अशी माहिती जिल्हा कृषि अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.

अमळनेर शहरातील कारंजा चौक येथील श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशन या दुकानात शासनाकडून मान्यता नसलेले व विक्रिस बंदी असलेले एचटीबीटी कापसाचे बियाणे विक्री केली जात असल्याची माहिती कृषि विभागाला मिळाली.

त्यानुसार आज बुधवारी कर्मचार्‍यांनी संबंधित दुकानावर सापळा रचून कारवाई केली. दुकानातून विक्रीस बंदी असलेले 5 हजार रुपये किंमतीचे 5 कापूस बियाणे पाकिटे जप्त करण्यात आले.

याप्रकरणी श्रीकृष्ण ग्रो व इरिगेशनचे मालक जितेंद्र दिनकर पाटील रा. अमळनेर यांचेविरुध्द बियाणे नियम 1968 व पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 नुसार अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वैभव शिदे, तालुका कृषि अधिकारी, अमळनेर भरत वारे, मोहिम अधिकारी पी. एस. महाजन, जिल्हा परिषद, जळगाव, अमोल भदाणे, कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत समिती, अमळनेर गणेश पाटील, व कृषि सहाय्यक अमळनेर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com