राज्य सरकारच्या चुकांमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग

आमदार गिरीश महाजन यांनी डागली तोफ
राज्य सरकारच्या चुकांमुळे वाढला कोरोनाचा संसर्ग

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

राज्य सरकारने केलेल्या चुकांमुळे राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. राज्य सरकारने योग्य वेळी आवर घातला असता, तर कोरोनाचा उद्रेक झाला नसता. तसेच राज्य सरकारने काही निर्बंध घातले असते तर बरे झाले असते.

मात्र, सत्ताधार्‍यांकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याची टीका भाजप नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली. राज्यभरात आज सर्वत्र शिवजयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त आ. महाजन शुक्रवारी सकाळी 9 वाजता शिवतीर्थ मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आले होते. अभिवान कार्यक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.

यावेळी आमदार राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके,स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगेपाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आमदार महाजन पुढे म्हणाले की, राज्यभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. शासनाने योग्य वेळी काही निबर्ंंध घातले असते तर ही वेळ आलीच नसती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आताही कडक निर्बंध घातले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती आहे. त्यामुळे जनतेने आपली काळजी घ्यावी, आपल्या कुटुंंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

शिवजयंती साजरी करण्यावरच निर्बंध का?

शिवजयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधावर आमदार महाजन यांनी नाराजी व्यक्त करीत कोरोनाच्या सावटाखाली आज शिवजयंती साजरी होत आहे. एकीकडे राज्य शासनाचे मंत्री शासन नियमांची पायमल्ली करत आहेत. दररोज मंत्री मोठ्या रॅली काढत आहेत.

हजारोंच्या संख्येने मेळावे घेत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही. म्हणून मी राज्य शासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. तुम्ही आपल्या लोकांना आवर घालू शकत नाहीत, मग लोकांवर निर्बंध का? कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढत आहे का?. म्हणून सर्वांना नियम लागू झाले पाहिजेत. मात्र, आज आपल्या जाणत्या राजाची जयंती आहे म्हणून आम्ही नियमांच्या चौकटीतच उत्सव साजरा करू, असेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com