किशोर पाटील - Kishor Patil ,Jalgaon - जळगाव :

जिल्ह्यात राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी करोनायोध्दा आरोग्य कर्मचार्यांसह पोलीस कर्मचार्यांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे.

यात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच इतर कर्मचारी अशा 3 हजार 421 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार असून त्याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दै. देशदूत शी बोलतांना दिली.

राज्यात मार्च 2020 पासून करोना थैमान घालत आहे. या कोरोनाच्या या आपातकालीन संकटाशी कोरोनायोध्दा म्हणून प्रशासनातील आरोग्य कर्मचारी, व पोलीस कर्मचारी दोन हात करत आहेत.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस तसेच आरोग्य कर्मचार्यांचा मोलाचा वाटा आहे. कोरोनात काळात कामगिरी बजावत असतांना पोलीस कर्मचार्यांचे बळी गेले आहेत. जळगाव जिल्ह्यात चार कर्मचार्यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

शासनाने कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार केली. सर्वात आधी कोरोना नियंत्रणात महत्वाची जबाबदारी बजावत असलेल्या आरोग्य कर्मचार्यांना तसेच पोलीस कर्मचार्यांना कोरोना लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

पोलीस महासंचालकांनी मागविली माहिती

पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस कर्मचार्यांना लसीकरणासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलीस महासंचालकांची नियुक्ती केली आहे.

नाव, जन्म तारीख, जुने आजार यासह 15 मुद्यांना अनुसरुन त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकार्यासह सर्व कर्मचार्यांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागविण्यात आली होती.

त्यानुसार जिल्ह्यातील एकूण 3 हजार 421 कर्मचार्यांची माहिती अप्पर पोलीस महासंचालक तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे.

दोन टप्प्यात दोनदा दिली जाणार लस

राज्यात आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यास 30 डिसेंबर रोजी पासून प्रारंभ झाला आहे. पोलीस कर्मचार्यांना नेमकी कधी लस दिली जाणार आहे, याबाबत अद्याप तारीख ठरविण्यात आलेली नाही.

पहिल्यांदा कर्मचार्याला लस दिल्यानंतर महिनाभरानंतर पुन्हा लस दिली जाणार असल्याचेही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.