अजब कारभार...कानळद्यात पुढार्‍यांच्या नातेवाईकांना कारमध्ये लसीकरण

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकार्‍यांची सारवासारव; केंद्रावर तणाव
अजब कारभार...कानळद्यात पुढार्‍यांच्या नातेवाईकांना कारमध्ये लसीकरण

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

देशभरात लसीकरणासाठी भर उन्हात लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परंतु दुसरीकडे जळगाव तालुक्यातील कानळदा गावात आरोग्य केंद्रातील परिचारीकांनी गावातील पुढार्‍यांच्या नातेवाईकांना गावाबाहेर जात कारमध्ये लसीकरण केल्याचा धक्कादायक आरोप लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांनी केला.

दरम्यान हा प्रकार लक्षात येताच कानळदा येथील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रावर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता.

यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात गोंधळ शांत केला. मात्र जि.प.चे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांनी या प्रकाराबाबत नकार दिला.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून प्रत्येक ठिकाणाच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

परंतु देशभरात लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक नागरिक दिवसभर रांगेभ उभे राहून देखील त्यांना लस मिळत नसल्याने ते रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

त्यातच जळगाव तालुक्यातील कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील गेल्या काही दिवसांपासून नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे.

दररोज प्राथमिक आरोग्य केंद्राला 110 डोस दिले जात आहेत. मात्र या ठिकाणी दररोज तीनशेहून अधिक नागरिकांची लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. आज शुक्रवारी देखील सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होत

वशीला लावून केले जातेय लसीकरण

कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरिक सकाळपासून रणरणत्या उन्हात रांगेत उभे होते.

मात्र केंद्रावरील दोन परिचारीका भोकर येथील एका पुढार्‍याच्या कुटुंबियांना लस देण्यासाठी कारमध्ये कानळदा गावा बाहेर असलेल्या एका बियरबार परिसरात जावून त्यांना लस टोचल्याचा प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला.

त्यामुळे लसीकरणात देखील आता पुढार्‍यांकडून वशीलेबाजीर होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

गावाबाहेर कारमध्ये भोकर येथील एका पुढार्‍याच्या कुटुंबीयांना लस दिली जात असल्याची माहिती गावातील काही युवकांना मिळताच त्यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली.

या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काही कर्मचारी देखील त्या ठिकाणी आढळून आले. यामुळे संतप्त नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रावर चांगलाच गोंधळ घातला. तसेच गाव पुढार्‍यांना वशिल्याने केंद्र सोडून दुसरीकडे लसीकरण केले जात असल्याचाही आरोप संतप्त नागरिकांनी केला.

अन् पोलिसांनी केली मध्यस्ती

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचा गोंधळ वाढतच असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकार्‍यांनी झालेला गोंधळाबाबत तालुका पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर या ठिकाणी पोलिस पथक दाखल झाले. वाद वाढत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करून वाद शांत केला. या वादामुळे काही काळ लसीकरणाची प्रक्रिया देखील बंद पडली होती.

युवकांना बघताच कर्मचार्‍यांनी काढला पळ

पुढार्‍यांचे गावाबाहेर लसीकरण सुरु असतांना युवकांनी त्याठिकाणी धाव घेतली.त्यांना बघताच लसीकरणासाठी आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळावरून पळ काढून आरोग्य केंद्र गाठले. या ठिकाणी एका व्यक्तीला लसीकरण करण्यात आल्याचा दावा देखील या युवकांनी केला आहे. इतरांनाही लसीकरण करण्यात येणार होते मात्र त्याआधीच त्याठिकाणी गोंधळ निर्माण झाल्याने इतरांना लसीकरण करता आले नाही अशीही माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. तसेच सामान्य नागरिकांना चार-चार दिवस रांगेत उभे राहून देखील मिळत नाही. मात्र दुसरीकडे वशिला लावून लोकप्रतिनिधींना वशिल्याने लसीकरण केले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

वैद्यकीय अधिकार्‍यांची सारवासारव

संबंधित आरोग्य विभागातील कर्मचारी कीनोद या गावाला जात होते. त्यांना काही नागरिकांची विचारपूस करण्यासाठी गावाबाहे थांबविलेव होते. त्याच्या गैरसमजातून हा वाद झाला. गावाबाहेर लसीकरण झाल्याचा असा कुठलाही प्रकार याठिकाणी घडला नसल्याची माहीती कानळदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एम.एन. पेशेट्टीवार देत घडलेल्या प्रकाराबाबत सारवासारव केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com