जळगाव – Jalgaon

लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो, पण लसीकरणानंतर झालेल्या कोरोनाची तीव्रता कमी असते. ताप, खोकला किंवा कोरोनामुळे शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होत नाही. कोरोना लसीकरणुळे 94 टक्के लोकांना संरक्षण मिळते. त्यामुळे लसीकरण महत्वाचे आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी कळविले आहे.

देशभर लसीकरणाची मोहीम सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील इतर आजार असणाऱ्या नागरीकांचे लसीकरण केले जात आहे. दरम्यान लसीकरणामुळे कोरोना होणार नाही, अशी अनेकांची समजूत आहे. वास्तविक लसीकरणानंतरही काही लोकांना कोरोना होऊ शकतो. मात्र कोरोना संसर्ग झाल्यानंतर एखाद्याच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामाला निश्चितपणे लगाम बसणार आहे.

लस घेतल्यानंतरही सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. कोरोनाच्या आधी लस घेणे गरजेचे आहे. मास्क वापरणे बंधनकारक आहे. सध्या कोरोनामुळे 100 पैकी 2 ते 3 लोकांचा मृत्यू होत आहे. हे मृत्यूचे प्रमाण रोखण्यात शासनाकडून दिली जाणारी लस प्रभावीपणे काम करते. मृत्यूदर कमी करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. सध्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन ह्या लस दिली जात आहे. दोन्ही लस प्रभावी आणि सुरक्षित आहे.

60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्ती जसे कॅन्सर, किडनीचे आजार असणाऱ्यांनाही ही लस घेता येते. जळगाव जिल्हयात पहिल्या टप्प्यात आरेाग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला तर तिसऱ्या टप्यात 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 86 हजार 677 व्य्क्तींना पहिला डोस तर 11 हजार 698 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणासाठी जिल्हयात 77 प्राथमिक आरोग्य केंद्र, 22 ग्रामीण रुग्णालये, 23 खाजगी रुग्णालये ह्या ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु आहेत.

लस घेतल्यानंतर हे जाणवेल

लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सामान्य परिणाम दिसतात ते 1 ते 2 दिवस राहतात. सध्या पॅरासिटमॉल या औषधाने बरे वाटते. काहीला ते जाणवत नाहीत. इतर त्रास झाला तर घाबरण्याचे कारण नाही, लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढते.

लस घेण्यासाठी जाताना

लस घेण्याआधी जेवण करुन जावे तसेच आधारकार्ड व पॅनकार्ड अथवा ओळखपत्र घेऊन जावे.

दोन वेळा लस घ्यावी लागते

पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेतला पाहिजे, हदयरोग, किडनी विकार, प्रत्यारोपण, संधिवात, स्टिरॉईड घेणाऱ्यांनी लस घ्यावीच. धोका नसला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतल्यास उपयुक्त ठरते.

कोणी लस घेऊ नये

गर्भवती महिला आणि 16 वर्षाखालील मुलांनी लस घेऊ नये,

लसीकरणानंतर काय खबरदारी घ्यावी

लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझरचा वापर, तसेच सुरक्षित अंतर ठेवलेच पाहिजे, लसीकरणामुळे मृत्यूदर कमी करण्यास मदत होणार आहे. गभीर रुग्णांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा व त्यानंतर 14 दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद डॉ. जमादार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.