जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना नियंत्रणासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असतांनाही नागरिकांची बेफिकीरी कोरोनाला निमंत्रण देत आहे.

लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली असतांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक दिसल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्हाभरात कारवाईसाठी सात अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. मार्च 2020 पासून या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश लागू करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता, त्यावर तात्काळ नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मास्कचा वापर न केल्यास प्रत्येकी 500 रुपये दंड

कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना म्हणून मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणार्यांवर 500 रुपये दंडाची आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभ, अंत्यविधीच्या ठिकाणी 50 व्यक्तीच्या वर असल्यास प्रत्येकी 200 रुपये दंड आणि गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहे.

कारवाईसाठी सात अधिकार्यांची नियुक्ती

कोरोना नियंत्रणासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सात अधिकार्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर निवासी उपजिल्हाधिकारी यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जमावबंदी लागू

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 मार्च 2021 पर्यंत जमावबंदी लागू करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी जारी केले आहे.

जिल्ह्यात 250 जणांवर कारवाई

पोलीस आणि मनपा प्रशासनाने मास्क न वापरणार्यांवार कारवाईची मोहीम सुरु केली आहे. महापालिकेच्यावतीने 154 नागरिकांवर कारवाई केली असून, 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्हाभरात 250 नागरिकांवर कारवाई करुन 1 लाख 15 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात तब्बल 169 कोरोनाचे रुग्ण आढळले

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात 169 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या 58 हजार 21 एवढी झाली आहे. तसेच चार दिवसांपासून बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात भडगाव, एरंडोल, बोदवड या तीन तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 55 हजार 985 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 1 हजार 369 बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर 84, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 12, अमळनेर 5, चोपडा 4, पाचोरा 1, धरणगाव 5, यावल 1, जामनेर 6, रावेर 3, पारोळा 7, चाळीसगाव 23, मुक्ताईनगर 10 यासह इतर जिल्ह्यातील 3 असे एकूण 169 नवे रुग्ण आढळून आले आहेत.