गाळ्यांसह लवादकाच्या विषयावरुन महासभेत गदारोळ

बहुमताने मंजूर ; भाजप- शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी
गाळ्यांसह लवादकाच्या विषयावरुन महासभेत गदारोळ

जळगाव- Jalgaon

मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांबाबत ठराव आणि मनपा व वॉटरग्रेसमधील वादविवाद मिटविण्यासाठी लवादक नियुक्तीच्या ठरावाला भाजपने हरकत घेवून विरोध केला मात्र सत्ताधारी शिवसेनेने बंडखोर नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे बहुमताने मंजूर केला. या दोन्ही विषयावरुन महासभेत चांगलाच गदारोळ झाला.दरम्यान, ऑनलाईन महासभेत बहुमत कसे सिध्द केले असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी विचारल्यानंतर भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये खंडाजगी झाली. अखेर महापौर जयश्री महाजन यांनी सर्व सदस्यांना सूचना केल्यानंतर वाद मिटला.

मनपाची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ऑनलाईन पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील,आयुक्त सतीष कुलकर्णी ,नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते.महासभेच्या सुरुवातीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महापौरनिवडीनंतर पहिलीच महासभा असल्याने महापौर जयश्री महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. राजकारण बाजूला सारुन शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानंतर स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील यांनी महासभेत सादर केलेले मनपाचे अर्थसंकल्प मंजूर करण्यात आले.


सत्ताधारी - विरोधकांचा सभागृहात गोंधळ
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या ठराव तहकुब करण्यात यावा अशी मागणी ऍड.शुचिता हाडा यांनी केली.मात्र महापौर जयश्री महाजन यांनी या ठरावाला ४२ नगरेवकांचा पाठिंबा असल्याने हा ठराव बहुमताने मंजूर केला. त्यानंतर मनपा आणि वॉटरग्रेस यांच्यातील वादविवाद मिटविण्यासाठी लवादक नेमण्याच्या ठरावाच्या विषयावर भाजपची भूमिका न ऐकता मंजूर करत असल्याने संतप्त झालेले भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे,अश्‍विन सोनवणे,धिरज सोनवणे,भगत बालाणी,राजेद्र घुगे-पाटील,सदाशिव ढेकळे,विशाल त्रिपाठी यांनी थेट सभागृहात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी महापौरांच्या व्यासपीठावर धाव घेवून दोन्ही ठरावावर हरकत घेतली. तसेच ऑनलाईन महासभेत बहुमत कसे सिध्द केले असा सवाल उपस्थित करुन भाजपच्या नगरसेवकांनी बहुमत सिध्द करण्याची मागणी लावून धरली त्यामुळे महासभेत गोंधळ उडाला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक सुनिल महाजन,ललित कोल्हे, विष्णू भंगाळे,नितीन बरडे, बंटी जोशी, प्रशांत नाईक हे देखील सभागृहात दाखल झाले. त्यामुळे आरोप - प्रत्यारोपावरुन भाजप- शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याने पुन्हा गोंधळ वाढला. दरम्यान,महापौरांनी दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना सभागृहातून जाण्याची सूचना केल्यानंतर वाद मिटला. आणि दहा मिनिटांनी पुन्हा सभेचे कामकाज सुरु झाले.

गाळ्यांच्या ठरावावर भाजप तटस्थ
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील ज्या गाळेधारकांनी थकबाकीचा भरणा केलेला आहे. अशा गाळेधारकांचे गाळे नूतनीकरण आणि ज्यांनी थकबाकी भरली नाही अशा गाळ्यांचा लिलाव करण्यासंदर्भात प्रशासनाने महासभेसमोर प्रस्ताव ठेवला होता. या विषयावर चर्चा करतांना भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनी हा विषय सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून चर्चा केली असती, आणि त्यानंतर त्यासाठी स्वतंत्र सभा घेण्याची सूचना मांडली आहे. गाळ्यांबाबत पाचपट दंड रद्दचा ठराव शासनाकडे प्रलंबित आहे. याबाबत आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नदेखील उपस्थित केला होता. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळ्यांचा प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात गाळेधारकांना आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे हा ठराव तहकूब करण्यात यावा अशी मागणी केली. दरम्यान, या ठरावाला भाजप तटस्थ असल्याची भूमिका ॲड. हाडा यांनी मांडली असून, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर हा ठराव बहुमताने मंजूर केला.


लवादक नेमण्याच्या ठरावाला भाजपचा विरोध
शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी मनपाने पाच वर्षांसाठी वॉटरग्रेस कंपनीसोबत करार केला आहे. मात्र मनपा आणि वॉटरग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने प्रशासनाने लवादक नियुक्तीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला. दरम्यान, या ठरावाला भाजपने विरोध केला असून, बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेने ठराव बहुमताने मंजूर केला आहे.

हाडा यांनी मांडली असून, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर हा ठराव बहुमताने मंजूर केला.
लवादक नेमण्याच्या ठरावाला भाजपचा विरोध
शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईसाठी मनपाने पाच वर्षांसाठी वॉटरग्रेस कंपनीसोबत करार केला आहे. मात्र मनपा आणि वॉटरग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याने प्रशासनाने लवादक नियुक्तीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला. दरम्यान, या ठरावाला भाजपने विरोध केला असून, बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर शिवसेनेने ठराव बहुमताने मंजूर केला आहे. 

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com