इमारत तोडत असताना स्लॅबच्या फटीत अडकून ठेकेदाराचा मृत्यू

आदर्शनगरातील घटना; एक मजूर गंभीर जखमी; कुटुंबाचा आक्रोश
इमारत तोडत असताना स्लॅबच्या फटीत अडकून ठेकेदाराचा मृत्यू

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

स्लॅब तोडत असतांना स्लॅबचे आतून तुटल्याने त्यामध्ये अडकून अजबराव रूपचंद चंदनकर (वय-45) रा. रेणूका नगर, रामेश्वर कॉलनी या ठेकेदाराचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 5 वाजेच्या सुमारास आदर्शनगरात घडली. त्यांचा मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात आणला असता त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला.

याबाबत नातेवाईंकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील मेहरुण परिसरातील रेणुकानगरातील रहिवासी अजबराव चंदनकर हे पत्नी दोन मुलांसह वास्तव्यास आहे.

अजबराव यांचे मेहरुण परिसरातील अशोक किरणा येथे फर्निचरचे दुकान असून ते जुन्या इमारती तोडण्याचे ठेकेदार देखील आहे.

त्यांचा मुलगा राहूल हा आपल्या वडीलांना मदत करतो. गेल्या आठवड्याभरापासून त्यांनी आदर्शनगरातील आयडीबीआय बँकेच्या शेजारील एक जुनी इमारात तोडण्याचा ठेका घेतला होता आणि राहूल हा काही मजूरांसह ती इमारत तोडण्याचे काम गेल्या आठवड्याभरापासून करीत होता.

आज दुपारी 5 वाजेच्या सुमारास ठेकेदार अजबराव चंदनकर हे इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील स्लॅब तोडण्याचे काम सुरु असल्याने याठिकाणी खुर्ची टाकून बसले होते.

याचठिकाणी दोन मजूर हातोड्याने स्लॅब फोडत असतांना स्लॅबला अचानक मोठा तडा गेल्यामुळे तो मध्यभागातून दुभंगला गेला आणि त्या फटीत अडकून अजबराव चंदनकर या ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला तर स्लॅब तोडत असलेला दौलत वंजारी (वय-26) रा. धोबी वराड ता. पाचोरा हा मजूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलाच्या डोळ्यासमोर वडीलांचा मृत्यू

स्लॅब तोडत असतांना अचानक स्लॅब तुटल्यलेल्या कात्रीत वडील अडकल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच बाजूच्या खोलीत काम तरीत असलेला त्यांचा मुलगा राहुल हा त्याठिकाणी आला त्याने इतर मजूरांच्या मदतीने वडीलांना बाहेर काढीत त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केल्याने मुलाच्या डोळ्यासमोरच वडिलांचा मृत्यू झाल्याने त्याला अश्रू अनावर झाले होते.

कुटूंबियांचा मन हेलावणारा आक्रोश

स्लॅबमध्ये अडकून अजबराव चंदनकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाल्याचे बघताच कुटुंबियांनी मन हेलावरणारा आक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.

पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नी सून्न

पतीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच अजबराव यांची पत्नीने टाहो फोडीत आक्रोश केला. परंतु थोड्यावेळानंतर त्यांना इतका मानसिक धक्का बसला की त्यांच्या तोंडातून शब्द देखील निघत नसून दातखिळ बसल्याने त्या सून्न झाल्या होत्या. उपस्थित कुटुंबियांनी त्यांना बोलण्यासाठी विनवनी केली असता त्या केवळ हातवारे करुन आपल्या मुलाला त्याच्या वडीलांकडे घेवून जाण्याबाबत वारंवार इशारा करीत होत्या. हा प्रसंग अनेकांनी पाहिल्यामुळे अनेकांच्या अंगावर काटे आले होते.

तिसर्‍या मजल्यावरुन पडल्यानंतरही बचावले होते ठेकेदार

गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी इमारत तोडत असतांना ठेकेदार अजबराव चंदनकर हे तिसर्‍या मजल्यावरुन पडल्याची घटना घडली होती. परंतु यावेळी त्यांचे नशिब बलवत्तर असल्याने ते बालंबाल बाचावले होते. परंतु आज स्लॅब तोडत असतांना काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि त्यात ठेकेदाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याने उपस्थित नातेवाईकांसह मित्र मंडळींकडून हळहळ व्यक्त केली जात होती.

आई... तू... बोल न गं आई...!

एकीकडे वडीलांचा मृत्यू झाल्याने राहुलच्या आईला मानसिक धक्का असल्याने त्या सुन्न झाल्या होत्या. यावेळी राहूलने आई तू बोल न ग आई... पप्पा गेले अस कस झालं... अशी काय करते गं आई... वाटलं तर मला मार असे म्हणत राहूलने आईचा हात धरुन आपल्या कानशिलात लगावित तो मनपिळवून टाकणारा आक्रोश करीत असल्याने हा प्रसंग पाहुन उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com