सकारात्मक दृष्टिकोनातून व्हावी सातत्यपूर्ण वाटचाल

बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांचे प्रतिपादन
सकारात्मक दृष्टिकोनातून व्हावी सातत्यपूर्ण वाटचाल

ऑनलाईन संवाद सत्राच्या समारोपात सांगितली पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणाची वाटचाल

भुसावळ - प्रतिनिधी

कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यासाठी माध्यम म्हणून पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचतील यासाठी निर्मिती प्रक्रियेतील सर्वच घटकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने वेळेच्या आत विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचू शकली. त्यामुळे संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले.

बारावी युवकभारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बारावी युवकभारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमाच्या समारोपाप्रसंगी श्री.गोसावी बोलत होते.

प्रारंभी डॉ. जगदीश पाटील यांनी गेल्या चार दिवसात हिरा बनसोडे, डॉ.प्रतिमा इंगोले, कल्पना दुधाळ, अनुराधा प्रभुदेसाई या लेखक-कवींनी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधल्याचे सांगितले. तसेच वयाच्या 34 व्या वर्षी निर्मिती नियंत्रक या पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या श्री.गोसावी साहेब यांनी आतापर्यंतच्या आपल्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत नेतृत्वगुण, कर्तबगारी व कल्पकता यांची वेळोवेळी चुणुक दाखवली असल्याचेही डॉ.पाटील यांनी परिचयातून सांगितले.

त्यानंतर बालभारतीचे संचालक विवेक गोसावी संवाद साधताना म्हणाले की, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दहा कोटींपैकी तीन कोटी पाठ्यपुस्तके छापून यायची बाकी होती. त्यात बारावीच्या पाठ्यपुस्तकांचा देखील समावेश होता. दरम्यान, माझे ऑपरेशन झाले असले तरी त्याचा व्यत्यय पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरणात येऊ नये याची मी वेळोवेळी काळजी घेतली.

यासाठी निर्मिती प्रक्रियेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सचे पालन करून ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. आधीच बालभारतीने पीडीएफ पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली होती, तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या हातात लवकरात लवकर पाठ्यपुस्तके जावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाठ्यपुस्तके विक्रीस सुरूवात झाली.

पाठ्यपुस्तक मंडळाचे नियंत्रक व सध्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडत असतांना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू ठेवून मीसुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून कामाची वाटचाल सुरू ठेवली असल्याचेही श्री.गोसावी यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यानंतर मराठी भाषा तज्ज्ञ समितीच्या डॉ. माधुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन संवाद सत्राच्या समारोपात महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com