ग्रामीण भागात आढळले 19 दूषित रक्तजल नमुने

डेंग्यू प्रतिरोधासाठी जनजागृती मोहीम; कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
ग्रामीण भागात आढळले 19 दूषित रक्तजल नमुने

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पावसाळ्याच्या दिवसात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता असल्याने जून महिन्यात शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून त्यात ग्रामीण भागात 44 रक्तजल नमुन्यांपैकी 19 दूषित रक्तजल नमुने आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डेंग्यू प्रतिरोधासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून 1 जुलैपासून जनजागृती मोहिमेद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोध राबविण्यासंदर्भात आरोग्य सहसंचालकांच्या सूचना होत्या. त्यानुसार जून महिन्यात हिवताप प्रतिरोध एक कार्यक्रम राबविण्यात आला.

डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती करण्यासाठी जलद ताप सर्वेक्षण,गप्पी मासे सोडणे, कोरड्या दिवसाचे महत्व,कंटेनर सर्वेक्षण, डेंग्यू ताप आजाराविषयी हस्तपत्रिका वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शुक्रवारी ‘येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची’अशी विविध भिंतीवर घोषवाक्य तयार करुन नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे,अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील यांनी दिली.

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू ताप-लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरुपाचा ताप येतो. मोठया माणसांमध्ये अधिक तीव्र स्वरुपाचा ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचे चट्टे येऊ शकतात. अंगदुखी तीव्र स्वरुपात असू शकते. म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोक्याच्या मागील भागात वेदनाची डोळयांच्या हालचालीसोबत अधिक होते, चव आणि भूक नष्ट होणे, त्वचेवर व्रण उठणे असे लक्षणे दिसून येतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com