जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

अपघाताच्या गुन्ह्यात मदत करुन वाहन सोडण्यासाठी 15 हजाराची लाच स्विकारणार्या धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत पाळधी दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल सुमीत संजय पाटील (27,रा.निवृत्ती नगर, जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी एक वाजता अटक केली आहे. पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातच सापळा रचून पथकाने ही कारवाई केली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील 27 वर्षीय तरुणाच्या वाहनाचा अपघात झालेला आहे. या अपघाताच्या गुन्ह्यात वाहन ताब्यात घेण्यात आलेले असून,

या गुन्ह्यात कागदपत्रात मदत करणे व वाहन सोडण्यासाठी कॉन्स्टेबल सुमीत पाटील याने 29 डिसेंबर रोजी तक्रारदाराकडे 15 हजाराची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.

दूरक्षेत्रातच रचला सापळा

लाचेच्या मागणीनंतर उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील,मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासीर देशमुख व ईश्वर धनगर यांनी तक्रारीची पडताळणी करुन सोमवारी पाळधी दूरक्षेत्रातच सापळा रचला.

याठिकाणी तक्रारदाराकडून 15 हजार रुपये स्विकारतांना सुमीत पाटील यास रंगेहाथ पकडण्यात आले.

याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान पाटील पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांचा रायटर असून गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.