विकासात्मक कामे पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या : खा.रक्षा खडसे

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले निर्देश
विकासात्मक कामे पूर्ण करुन नागरीकांना लाभ मिळवून द्या : खा.रक्षा खडसे

जळगाव - Jalgaon

यंत्रणांनी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. असे निर्देश खासदार रक्षाताई खडसे यांनी आज दिले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खासदार श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पार पडली, यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार श्रीमती लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन पाटील, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री.शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते तर खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील यांचेसह विविध पंचायत समित्यांचे सभापती व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी खासदार श्रीमती खडसे म्हणाल्या की, कोरोनामुळे मागील काळात लॉकडाऊनमुळे विविध विकास कामे करता आली नाही. परंतु आता कामांना गती देऊन शासनाच्या योजना र्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत व या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्याच सूचनाही त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची गती वाढवा.

जिल्ह्यातील ज्या नगरपालिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी प्राप्त झाला नसेल त्याची माहिती द्यावी, हागणदारीमुक्त गावांमध्ये नागरीक उघडयावर शौचास जातात हे योग्य नसून स्वच्छ भारत योजनेत वैयक्तिक शौचालयांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी.

तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतरस्त्यांची कामे करावीत. कोरोनामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच खाजगी रुग्णालये रुग्णांकडून चुकीची बिलांची आकारणी करीत आहे. कोविड उपचार करणाऱ्या रुग्णालयाबाहेर उपचाराचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. जेणेकरुन सर्वसामान्य नागरीकांची लुट होणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा साठा मुबलक राहील याचीही यंत्रणेने दक्षता घ्यावी, त्याचप्रमाणे कोरोना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, कोविड उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांची माहिती लोकप्रतिनिधींना देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात.

योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होता कामा नये - खासदार उन्मेष पाटील सर्वसामान्य नागरीकांसाठी शासन विविध लोकोपयोगी योजना राबवित असते. या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जे अधिकारी योजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करतील. त्यांचेवर कारवाई करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी केली. तसेच अमृत योजनेची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, शिवाजी नगर पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत नागरीकांना रेल्वेच्या ओव्हरब्रीजवरुन ये-जा करण्यास परवानगी मिळण्याची सुचनाही त्यांनी केली. यावेळी जिप अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील, आमदार सुरेश भाळे, चिमणराव पाटील, लताताई सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष यांनीही विविध सुचना मांडल्यात.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेत जिल्ह्यातील पंधरापैकी दहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यांचा समावेश करण्यासाठी प्रशासनातर्फे शासनास प्रस्ताव पाठविण्यात येईल असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत प्रधानमंत्री पिक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पाणीपुरवठा योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, रोजगार हमी योजना अमृत योजनांसह दूरसंचार, रेल्वे, खणीकर्म या मुलभूत सुविधा आदिंचाही आढावा घेण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com