स्वच्छतागृहात मृतावस्थेत आढळलेल्या वृद्धेच्या वारसांना 5 लाखाची भरपाई

औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, दोषींवर मुख्य सचिवांनी तात्काळ कारवाई करावी
स्वच्छतागृहात मृतावस्थेत आढळलेल्या वृद्धेच्या वारसांना 5 लाखाची भरपाई

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना काळात शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय मालती नेहते यांचा कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह जून महिन्यात आढळून आला होता.

याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत खंडपीठाने मालती नेहते यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असल्याने प्रशासकीय यंत्रणेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

याच काळात भुसावळ येथील कोरोनाबाधित रुग्ण 82 वर्षीय मालती नेहते या वृद्ध महिला उपचारासाठी दाखल होत्या. त्या 2 जून पासून रुग्णालयातून बेपत्ता झाल्या होत्या त्यानंतर 10 जून रोजी त्यांचा मृतदेह रूग्णालयातील स्वच्छतागृहात मृतदेह आढळून आल्याने राज्यासह देशभरात खळबळ माजली होती.

याप्रकरणी तत्कालीन डीनसह आरोग्य अधिक्षकांसह दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना निलंबीत केले होते. रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मालती नेहते यांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

भरपाईसाठी दाखल केली याचिका

नेहते यांच्या कुटूंबियांना न्याय मिळावा यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, कमला बि-हाडे (रा.अमळनेर) आणि रफीक तडवी (रा.उटखेडा, ता. रावेर) यांनी औरंगाबाद खंडपीठात 25 जून 2020 ला जनहित याचिका दाखल केली. यात नेहते यांच्या वारसांना 30 लाखांची नुकसान भरपाई मिळण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी न्यायालयाकडे दाद मागितली होती.

चार महिन्याच्या आत भरपाई द्या

औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती श्रीकांत कुळकर्णी व न्या. एस.व्ही. गंगापूरवाला यांनी या याचिकेच्या दोघ बाजू ऐकून घेतलयानंतर निकाल दिला.

यामध्ये राज्य शासनाने मयत मालती नेहते यांच्या वारसांना 5 लाख रूपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले असून ही भरपाई निकालापासून चार महिन्यात देण्यात यावी असे देखील आदेशात नमूद केले आहे.

तसेच घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आल्या दोषींवर राज्याच्या मुख्यसचिवांनी तातडीने कार्यवाही करावी असे देखील म्हटले आहे. याचिका कर्त्यांच्यावतीने अ‍ॅड. गायत्री सिंग व अ‍ॅड. अंकित कुळकर्णी यांनी कामकाज पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com