नागरिकांना पडला करोनाचा विसर
जळगाव

नागरिकांना पडला करोनाचा विसर

रविवारी सर्वत्र गर्दीच गर्दी

Rajendra Patil

जळगाव - प्रतिनिधी Jalgaon

कोरोनामुळे सण साजरे करण्यावर वीरजण पडले आहे, सर्व नागरिकांना सणवार साजरे करण्यास एकप्रकारे प्रशासनाने बंदीच आणली आहे. आज रविवारी मात्र खान्देशात कानबाईचा उत्सव होता. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात जवळपास सर्वच ठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.

काही दुकानेही उघडी असल्याचे दिसून आले. तर काही व्यापार्‍यांनी सुटीचा दिवस असल्याने दुकाने बंद ठेवली. गेल्या आठवडाभर प्रशासनाने जनता कर्फ्यू शहरात वेगवेगळ्या भागात ठेवलेला असल्याने नागरिक, दुकानदार, व्यावसायिक यांना स्वयंपूर्ण शिस्त पाळावीच लागली. त्यामुळे आठवडाभर बाहेर फिरणे, दुकाने उघडणे शक्य झाले नाही व आठवडाभर शहरात गर्दीचा ओढा काहीसा थांबला होता.

मात्र शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, दाणा बाजार परिसरात नागरिकांसह महिलांचीही अधिक प्रमाणात गर्दी दिसून आली. राजकमल टाकीज चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, बळीरामपेठ, शनिपेठ आदी भागात हॉकर्स व इतर दुकानदारांसह नागरिकांची मोठी गर्दी होती.

अतिक्रमीत, फूटपाथवाल्यांना सुगीचे दिवस

गेल्या दोन ते तीन दिवसापासून टॉवर चौक, बळीराम पेठ, फुले मार्केट, टॉवर चौक ते चित्रा चौक तसेच टॉवर चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप पयर्र्तच्या रस्त्याच्या दुतर्फा लागलेली अतिक्रमीत दुकाने, तसेच फुले मार्केटमधील फूटपाथवरील दुकानदार यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र रविवारीही होते.

रविवारी महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक शक्यतोवर नसतेच. याचा फायदा घेत अनेक दुकानदारांनी आपली दुकाने रस्त्यावर थाटलेली होती. फुले मार्केटमध्येही सकाळपासून दिवसभर व्यवसाय सुरूच राहिला. अधिकृत दुकानदारांची मात्र ऑनलाईन, होमडिलीव्हरीला परवानगी देवून प्रशासनाने चांगलीच पंचाईत करुन ठेवली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com