कर्जाची रक्कम परस्पर हडप; पतसंस्थेला कर्मचार्‍यांचा गंडा

चोपडा येथील महावीर पतसंस्थेच्या व्यवस्थापक व लिपिकावर गुन्हा दाखल
कर्जाची रक्कम परस्पर हडप; पतसंस्थेला कर्मचार्‍यांचा गंडा

चोपडा - Chopda - प्रतिनिधी :

शहरातील महावीर सहकारी पतसंस्थेच्या एका कर्जदाराकडून कर्जाची रक्कम वसुल करून सदर रकमेचा पतसंस्थेत भरणा न करता,कर्जदाराच्या मालमत्तेवरील संस्थेचा बोजा उतरवून संगनमताने कर्जाची रक्कम हडप करून व्यवस्थापक व लिपिक यांनी पतसंस्थेची फसवणूक करून अपहार केला.

या प्रकरणी महावीर पतसंस्थेच्या फिर्यादीवरून पतसंस्थेचे व्यवस्थापक व लिपिक या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने सहकार क्षेत्रात खडबळ उडाली आहे.चोपडा शहरातील धरणगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपा शेजारी असलेल्या अपोलो टायर्सचे संचालक पोल्सन चाकुल्ली मंजली यांनी महावीर सहकारी पतसंस्थेच्या बाजारपेठ शाखेतून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते.

त्यांच्याकडील कर्जाची रक्कम 1,08,342/- रुपये दि.21/10/ 2010 ते दि.06/ 08/ 2011 रोजी या दरम्यानच्या काळात कर्जदाराकडून महावीर पतसंस्थेचे बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र चंपालाल जैन व पतसंस्थेचे मुख्य शाखेचे लिपिक प्रवीण इंदरचंद जैन यांनी धरणगाव रस्त्यावरील अपोलो टायर्स च्या दुकानात भरणा स्विकारुन त्यांना कर्जाची रक्कम पूर्ण परतफेड केल्याचा दाखला देऊन तारण असलेली मिळकत क्रमांक गट नंबर-102/ 31 वरील पतसंस्थेचा बोजा कमी करण्याबाबत लेखी पत्र देऊन कर्ज खात्याची रक्कम महावीर पतसंस्थेत जमा न करता स्वतः जवळ ठेऊन दोघांनी संगनमताने अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केली आहे.

या प्रकरणी महावीर सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक अचल अशोकलाल अग्रवाल (48) रा.चोपडा यांच्या फिर्यादीवरून व्यवस्थापक नरेंद्र चंपालाल जैन व लिपिक प्रवीण इंदरचंद जैन रा. चोपडा यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं.131/2020 भादवि कलम 408,409, 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.निलेश सोनवणे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com