महावीर पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी दोन व्यवस्थापकांसह लिपिकास अटक

महावीर पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी दोन व्यवस्थापकांसह लिपिकास अटक

तिघांना तीन दिवस पोलीस कोठडी

चोपडा - Chopda - प्रतिनिधी :

येथील महावीर सहकारी पतसंस्थेत झालेल्या लाखो रुपयांच्या अपहारप्रकरणी संस्थेच्या मुख्य शाखेतील तत्कालीन व्यवस्थापक शोभा सुरेश सांखला,बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र चंपालाल जैन व मुख्य शाखेतील लिपिक प्रवीण इंदरचंद जैन अशा तिघांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याने स्वतः शहर पोलीस स्टेशनला हजर झाल्याने पोलिसांनी सोमवारी तिघांना अटक केली.

मंगळवारी चोपडा येथील न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.या घटनेने शहरात व सहकार क्षेत्रात प्रचंड खडबळ उडाली आहे.

महावीर पतसंस्थेच्या बाजारपेठ शाखेत अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रभारी व्यवस्थापक आचल अग्रवाल यांनी बाजारपेठ शाखेत जाऊन चौकशी केली असता,शहरातील अपोलो टायर्सचे मालक पोल्सन चांकुल्ली मंजली यांनी महावीर पतसंस्थे कडून दि.17/11/2006 रोजी मजरेहोळ (ता.चोपडा) शिवारातील गटनंबर -102/31 या मिळकतीवर 1,50,000/- रुपये तारण कर्ज घेतले होते.

कर्जदार यांनी कर्जा पोटी 75,932/-रुपये पतसंस्थेत रोख भरणा केल्याचे आढळून आले.उर्वरित कर्जापोटी 1,08,342/ - रुपये व त्यावरील दि.31/03/2020 अखेर व्याजा सह 4,35,492/- रुपये एकूण कर्ज येणे बाकी दिसत होते.

सदर बाब प्रभारी व्यवस्थापक अग्रवाल यांनी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळा समोर आणून दिली. त्यानंतर पोल्सन चांकुल्ली मंजली यांना थकीत कर्ज भरण्या बाबत संचालक मंडळाने विचारणा केली असता, कर्जदार मंजली यांनी पतसंस्थेच्या मुख्य शाखेतील तत्कालीन पिग्मी एजंट व लिपिक प्रवीण इंदरचंद जैन यांचे कडे संपूर्ण कर्जाचा व्याजासह भरणा केल्याचे पोल्सन मंजली यांनी सांगितले.

तसेच कर्जापोटी मजरेहोळ (ता.चोपडा) येथील गट नंबर-102/31 या मिळकतीवरील बोजा उतरविणे पूर्वी बाजार पेठ शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक नरेंद्र जैन व लिपिक प्रवीण जैन यांच्याकडे दिली होती.तसा दाखला व्यवस्थापक व लिपिक यांनी कर्जदारास दिलेला आहे.त्या प्रमाणे दुय्यम निबंधक यांचेकडे बोजा कमी करणेसाठी अर्ज करून बोजा कमी करण्यात आला परंतू कर्जदाराकडून रोख भरणा स्वीकारून सदर रक्कम पतसंस्थेत जमा न करता व्यवस्थापक नरेंद्र जैन व लिपिक प्रवीण जैन यांनी स्वतःजवळ ठेवून कर्जदार व पतसंस्थेची फसवणूक करून अपहार केला आहे.

शहरातील रहिवाशी विशाल विश्वासराव बोरसे यांनी स्वतः महावीर पतसंस्थेच्या मुख्य शाखेतून फक्त 50,000/- कर्ज घेतलेले आहे.यावेळी विशाल बोरसे यांची समंती न घेता त्यांचे नावावर बाजारपेठ शाखेतून 22,20,000/- रुपये कर्ज परस्पर घेऊन बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र जैन व लिपिक प्रवीण जैन यांनी संगनमताने विशाल बोरसे व पतसंस्थेची फसवणूक केलेली आहे.अशी तक्रार विशाल बोरसे व पतसंस्थेने केलेली आहे.

बोगस सोने तारण कर्ज प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक शोभा सांखला यांनी देखील पतसंस्थेची फसवणूक केलेली आहे.तसेच कर्जदार पोल्सन मंजली व पतसंस्थेची तत्कालीन व्यवस्थापक नरेंद्र जैन व लिपिक प्रवीण जैन यांनी संगनमताने फसवणूक केलेली आहे.

पतसंस्थेतील लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी प्रभारी व्यवस्थापक आचल अग्रवाल यांनी दि.23 सप्टेंबर 2020 रोजी शहर पोलीस स्टेशनला तत्कालीन व्यवस्थापक शोभा सुरेश सांखला, बाजारपेठ शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र चंपालाल जैन व लिपिक प्रवीण इंदरचंद जैन सर्व रा.चोपडा यांचे विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

त्यांच्या तक्रारीवरून भादवि कलम-408, 409,420 व 34 प्रमाणे तिघां विरोधात अपहार व फसवणुकी चा गुन्हा दाखल करण्यात आला असून,तिघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे.दरम्यान मंगळवारी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे व पो.ना.प्रदीप राजपूत करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com