जळगाव : दालमिल मधून जप्त केली केमिकल व रंगयुक्त डाळ
जळगाव

जळगाव : दालमिल मधून जप्त केली केमिकल व रंगयुक्त डाळ

लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Rajendra Patil

जळगाव - Jalgaon

देशामध्ये कोव्हिड -19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असताना या काळात खाण्याच्या पदार्थाची मागणी वाढल्याने त्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले, अशा प्रकारच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने या विभागाने लॉकडाऊन या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये देखील गोपनीय माहितीच्या आधारे एम.आय.डी.सी जळगाव येथे शनिवार ह्या सुट्टीच्या दिवशी एका डाळ मिलवर धाड टाकून त्याठिकाणी उडीद मोगर व मुंग डाळीचे उत्पादन विक्रीसाठी तयार असल्याचे आढळले.

या दाल मिलमध्ये उडीद मोगर या डाळीला लावण्यात येणारे सॉफ्ट स्टोन पावडरचा 146 किग्रॅ साठा (5 कट्टे) घटनास्थळी आढळले. सदर पावडरचा उपयोग हा उडीद मोगर डाळीमध्ये केलेला आढळला. तसेच मुग डाळ या अन्नपदार्थास खाद्यरंग लावल्याचे आढळले.

परिस्थितीजन्य स्थिती बघता अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी घटनास्थळी असलेल्या सॉफ्ट स्टोन पावडरचा नमुना भेसळकारी पदार्थ म्हणून घेवून उडीद मोगर या केमिकलयुक्त डाळीचा 2388 किग्रॅ साठा रितसर नमुना घेवून जप्त केला.

तसेच व मुग डाळीस अन्न सुरक्षा मानके कायद्याप्रमाणे रंग लावण्याची परवानगी नसल्याने रितसर नमुना घेवून शिल्लक साठा 758 किग्रॅ हा जप्त केला. एकूण साठ्याची किंमत रुपये 2,43,182 इतका आहे.

याप्रकरणी घेतलेले नमुने विश्लेषणासाठी पाठविले असता अन्न विश्लेषकाने उडीद मोगर या नमुन्यात अन्न सुरक्षा मानके कायद्याप्रमाणे परवानगी नसलेले केमिकल टल्क पावडर हे आढळून आले असल्याचे कळविले आहे. तसेच मुंग मोगर या डाळीच्या नमुन्यात खाद्यरंग लावल्याचे घोषित केलेले आहे.

याप्रकरणी पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील हे करत असून या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो.को. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलक आहे. यापुढेही अशा प्रकारे खाद्यपदार्थात भेसळ करणा-या व भेसळ करुन जनतेची दिशाभुल करणा-या विक्रेत्यांवर प्रशासनामार्फत कार्यवाही सुरु राहील.

जनतेने खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्कता बाळगून खाद्यपदार्थांची खरेदी करावी. असे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com