जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 23 फेब्रुवारी रोजी पुणे येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या सुमारे 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे तीन गुन्हे दाखल आहेत.

यात डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 27 नोव्हेंबर रोजी जळगाव शहरात बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर यांचे घर व कार्यालय, एमआयडीतील बीएचआर पतसंस्थेचे कार्यालय, विवेक ठाकरेंसह धरम सांखला, महावीर जैन यांचे घर व कार्यालयात छापे टाकले होेते.

सलग तीन दिवसांच्या कारवाईत पथकाने दोन गाड्या भरुन कागदपत्र व तांत्रिक पुरावे हस्तगत करण्यात आले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने सात संशयितांना अटक केली आहे. त्यापैकी सहा संशयित सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान रंजना घोरपडे यांच्या गुन्ह्यात उद्या 23 फेब्रुवारी रोजी पुणे येथील अतिरिक्त सत्र न्या. एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.