उभ्या पिकावर जेसीबी फिरवणार तो व्यक्ती कोण ?
जळगाव

उभ्या पिकावर जेसीबी फिरवणार तो व्यक्ती कोण ?

चाळीसगावात भु-माफियांचा सुळसुळाट,पोलीसांकडे शेतमालकाची तक्रार

Manohar Kandekar

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

तालुक्यातील रांजगणाव शिवारात दोन दिवसापूर्वी शेतीचा तांबा घेण्याच्या हेतुने, एका शेतातील उभ्या मक्यासह इतर पिकांवर जेसीबी मशिन फिरवण्यात आल्याने परिससरात एकच खळबळ उडाली आहे. शेतातील उभ्या पिकावरून जेसीबी मशिन चालवून पिक नष्ट केल्याची तक्रारी अर्ज चाळीसगाव ग्रामीण पोलीसांकडे शेतमालकाने दिला आहे.

दरम्यान ही शेतजमीन गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी उद्यास आलेल्या एका राजकिय व्यक्तीची असून त्यानेच उभ्या पिकावर अनाधिकृतपणे जेसीबी फिरवल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे. याप्रकरणी आता शेत मालकाला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी कृती समिती पुढकार घेतला असून तालुक्यातील तो राजकिय भु-माफिया कोण ? म्हणून सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल होत आहे.

रांजगणाव येथील शेतकरी वाझिर उस्मान पठाण (६५) व फिरोज दलमीर पठाण(४२) यांनी पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रांजणगाव शिवारातील शेत गट नं.४८०/१ ते ६ आम्ही मालक असून ही शेतजमिन सांगवीतील देविदास राठोड व त्यंाचे भाऊ यांना निम्मे बटाईने दिली आहे.१५ वर्षापासून ते कसत आहे. त्यावर भुईमुग, कपाशी, बाजरी पिकांची लागवड केली आहे.

१५ ऑगस्ट रोजी अज्ञात इसमाने सदरच्या शेतात घुसून उभ्या पिकावर जेसीबी मशिन फिरवून पिकांचे अतोनात नुकसान केले. आमचे कुणाशीही वैर नाही. या प्रकाराने आम्ही धास्तावले गेलो असूनहा प्रकार कुण्यातरी गाव गुंडाने केला असावा. याबाबत तपास करून आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती या तक्रार अर्जात वाझिद उस्मान पठाण व फिरोज दलमीर पठाण यांनी केली आहे. तक्रार अर्जात दोघांच्या सह्या असून चौकशी करण्याची मागणी केली.

रांजगाव शिवारातील शर्तीच्या जमीनीचा कुठलाही पूर्णता; व्यवहार झालेला नसताना, उभ्या पिकारवर अनाधिकृतपणे जेसीबी फिरवणारी ‘ त्या ’ राजकिय व्यक्तीच्या विरोधात आम्ही लवकरच शेतकरी कृती समितीच्यावतीने ‘ पीएम ’ कार्यालयाकडे दाद मागणार आहोत. तसेच दिल्ली येथे जावून शेतकर्‍यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कॉग्रेस पक्षाच्या मदतीसाठी प्रयत्नशिल आहोत.

भिमराव जाधव, सचिव-शेतकरी कृती समिती

हा राजकारणी गेल्या पाच ते सहा वर्षात श्रीमंत झाला असून त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून आशा देखील चर्चा आता होवू लागल्या आहेत. तसेच शेतकरी कृती समितीचे सचिव भिमराव जाधव यांनी सोशल मिडिमावर पोस्ट व्हायरल केली असून सत्तेचा दुरूपयोग करून गैरमार्गाने अशिक्षित अडाणी शेतकर्‍यांचा गैरफायदा उचलून शेतजमिनी बळकावणारे राजकीय भु-माफिया जास्त दिवस लपून राहणार नाही, गेल्या दोन दिवसाच्या चौकशीत बरीच माहिती समोर आली आहे, त्या आधारे लवकरच ती राजकीय व्यक्ती उजेडात येणार असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यामुळे उभ्या पिकावर जेसीबी फिरवणारी ती राजकिय व्यक्ती कोण असा प्रश्‍न उपस्थित केला जात असून अनेक चर्चांना ऊत आला आहे. याप्रकरणामुळे तालुक्यातील राजकारणाला भविष्यात वेगळे वळण मिळणार असून संबंधीत व्यक्ती ज्या पक्षा आहे, त्या पक्षा देखील याप्रकरणामुळे भविष्यात मोठी झळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर गेल्या पाच ते सहा वर्षात अनेकांना भुलथापा देणार्‍या ‘ त्या ’ राजकिय व्यक्तीचा खरा चेहरा जनतेसमोर येणार असल्याची देखील चर्चा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com