चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटामुळे बहुतांश जनतेची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे वीज बिल भरणे अनेकांना अशक्य झाले आहे. त्यात भर म्हणून अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिलं देण्यात आली. ही बिलं दुरूस्त करून देऊ, वीज बिल माफ करू ही महाविकास आघाडी सरकारची आश्वासने हवेतच विरली आहेत.

या सरकारने वीज बिलांची सक्तीने वसूली करण्यासाठी तुघलकी फर्मान काढले आहे. ग्रामीण भागातील शेती कनेक्शन तोडण्यासाठी धाडी टाकल्या जात आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकाला नोटीसा पाठवल्या पाठवून त्यांचे खच्चीकरण करण्याचे पाप हे महाभकास आघाडी सरकार करत आहे. पुन्हा जर शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट केल्यास भारतीय जनता पक्षातर्फे त्याला अटकाव करण्यात येईल व त्याचे गंभीर परिणाम महावितरण व महाविकास आघाडी सरकारला भोगावे लागतील असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरण मार्फत राज्यातील ७५ लाख वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी पाठविण्यात आलेल्या नोटीस रद्द कराव्यात व लॉकडाऊन काळातील घरगुती वीजबिल माफ करावे या मागणीसाठी चाळीसगाव येथील खडकी सबस्टेशन येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला. आंदोलनात किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोळे, माजी तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, सुरेश सोनवणे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक राजेद्र राठोड, संजय पाटील,महेंद्रसिंग प्रेमसिंग राठोड, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे आदि उपस्थित होते.