चाळीसगाव - Chalisgaon - प्रतिनिधी :

एजंटमार्फत जुळलेले लग्न लागण्याआधीच तरुणी (नववधू) पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याचा प्रकार चाळीसगाव येथे घडला आहे.

फसवणूक झालेल्या तरुणाने पोलीसांत धाव घेवून लग्न जुळवून देणारी मध्यस्थी एजंट महिला, नववधूसह एकूण सहाजणांच्या विरोधात पोलीसांत तक्रार दिली आहे.

यामुळे लग्नदावून देणार्या एजंटांमध्ये एकच खळबळ उडली असून शहरात हा विषय चर्चेचा झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगांव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील अंकुश भाऊसाहेब आमले (32) शेती व्यवसाय असलेल्या तरुणाचे लग्न औरंगाबाद येथील एजंट महिला संगीताबाई बाबुराव पाटील हिचेसह अशोक कडू चौधरी रा. कुंभारखेडा ता. रावेर, संदेश राजेश वाडे (चिखली जि. बुलढाणा), अकील मामा (रा. चिखली) यांच्या मध्यस्थीने ममता उर्फ देशमा रफीकखान रा. शहानगर, बीड बायपास औरंगाबाद हिचेशी दिड लाख रुपये घेवून जूळवले होते हे लग्न गेल्या 12 डिसेंबर 2020 रोजी करण्याचे ठरले.

त्यासाठी लग्नाचा कपडे-लत्ते सोने असा खर्च नवरदेव मुलाकडे असल्याने नवरी मुलगी ममताही खरेदीसाठी चाळीसगांवीच होती.

लग्नाची लगबग आणि खरेदी सुरु असतांनाच नवरी मुलगी ममता हिने लग्नबोहल्यावर चढण्याआधीच पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र वेळीच नवरदेवाच्या नातेवाईकांनी तिचा डाव पकडल्यानंतर नववधूने लग्नास चक्क नकार दिल्यानंतर नवरदेवाने दिलेल्या पैशांची परत मागणी केल्यानंतर ते पैसे मध्यस्थी एजंट म्हणून असलेल्या संगीताबाईने घेतल्याचे सांगीतल्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून तरुणाची फसवणूक करणार्या एजंन्ट, तरुणीसह(नववधू) सहाजणांच्या विरोधात तरुणाने तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दलाल पद्धतीमुळे तरुणाची फसवणूक

सध्या ज्याच्या घरात गरीबी आहे, ज्याचे जवळ मोठ्या स्वरुपात प्रॉपर्टी नाही असे अनेक तरुण पस्तीशी, चाळीशी ओलांडली तरी लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यातूनच लग्न करायचे असेल तर पैसे देवून परजिल्ह्यातून मुली वधू म्हणून स्विकारण्याशिवाय पर्याय नसल्याने बहूतांश जण जात-पात, पंथ बाजूला सारुन विवाह सोहळ्याच्या बोहल्यावर चढण्याचा पर्याय शोधत असतांना त्यासाठी दलाल पध्दत बोकाळली आहे हे एक वास्तव चित्र बहूतांश समाजाला पहावयास मिळत आहे. त्यातून काहींची फसवणूक देखील होत आहे.