लाचप्रकरणातील नायब तहसीलदाराला अटक
जळगाव

लाचप्रकरणातील नायब तहसीलदाराला अटक

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

सन 2016 मधील जळगाव तहसील कार्यालयातील लाचप्रकरणातील न्यायालयातील खटला व पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी म्हणून निष्पन्न झालेल्या तत्कालीन नायब तहसीलदार देवेंद्र सुरेश भालेराव (वय 52, रा.चंद्रलोक अपार्टमेंट, मोहननगर, जळगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.

ही कारवाई जळगावातील लाचलुचपत विभागाच्या पथकाने 25 रोजी सायंकाळी 7 वाजता मोटारसायकलचा पाठलाग करुन ख्वाँजामिया चौकाजवळील पेट्रोलपंपानजीक केली. भालेराव हा सध्या चाळीसगाव येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारपदी कार्यरत आहेत.

जळगावातील तहसील कार्यालयामध्ये सन 2016 मध्ये एका लिपिकास लाचप्रकरणी अटक झाली होती. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच वेळी गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असताना आणि पोलिसांच्या तपासादरम्यान देवेंद्र भालेराव हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत त्याची चाळीसगावला बदली झाली. यासंदर्भात दोन वेळा समन्स बजावून देखील तो न्यायालयात हजर झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अजामीनपात्र पकड वॉरंट काढले होते.

गोपनीय माहितीवर भर

याबाबत जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भालेराव याची गोपनीय माहिती घेतली. तो मंगळवारी चाळीसगावातील कार्यालयात नव्हता. त्यामुळे त्याच्या जळगावातील मोहनगरातील घरावर पथकाने पाळत ठेवली. सायंकाळी तो घरी आला.

घरात गेल्यानंतर 10 मिनिटात मोटारसायकलने बाहेर निघाला. पथकातील कर्मचार्‍यांनी त्याचा पाठलाग मोहननगर ते ख्वॉजामिया चौैकादरम्यान मोटारसायकलवर केला आणि त्यास पकडले. त्यास रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.

Deshdoot
www.deshdoot.com